शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

हॉटेल, बार, रेस्टारंटना 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत सशर्त परवानगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): राज्य शासनाच्या आदेशानुसार मार्गदर्शक सूचना, अटी व शर्ती घालून जिल्ह्यातील हॉटेल, बार, रेस्टारंट आदी आस्थापनेच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सकाळी 8 तेरात्री 10 पर्यंत सुरु करण्यास परवानगी दिल्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

 

 राज्य शासनाच्या आदेशान्वये दि. 5 ऑक्ओबर2020 पासून राज्यातील हॉटेल / बार / रेस्टॉरंट यांना मार्गदर्शक सूचना (SOP), अटी व शर्ती घालून हॉटेल / बार / रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनेच्या क्षमतेच्या 50% क्षमतेसह सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या असून रेस्टॉरंट आणि बार साठी सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वेळ निश्चित केलेली आहे.

पुणे विभागीय आयुक्त यांच्या परिपत्रकान्वये  हॉटेल / बार / रेस्टॉरंट मध्ये शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत व दोषी आढळणाऱ्या हॉटेल / बार / रेस्टॉरंटवर कडक कारवाई करण्याबाबत सुचित केलेले आहे.  महानगरपालिका क्षेत्रात संबंधित व्यावसायिकाला दंडाची आकारणी  करण्याचे  अधिकार  हे  संबंधित  महानगरपालिकेच्या  आरोग्य  विभागाचे  अधिकारी / कर्मचारी  यांना असतील.

त्याच प्रमाणे दंड वसुलीचे अधिकार पोलीस विभागाला देण्याबाबत संबंधित महानगरपालिकेने आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागात शासनाच्या आदेशातील अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी यांना आहेत. या भागातील दंड वसुलीबाबत पोलीस विभागाला अधिकार प्रदान करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी योग्य ते आदेश निर्गमित करण्याबाबत सुचित केलेले आहे.

जिल्ह्यातील हॉटेल/बार/रेस्टॉरंट/खाद्यगृहे यांनी नियम, अटी व सूचनांचे पालन करण्यात कसूर केल्यास निश्चित केलेल्या दंडाची कारवाई करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व महानगरपालिकेचे अधिकारी / कर्मचारी तसेच हॉटेल / बार / रेस्टॉरंट च्या संघटनेने उपलब्ध करुन दिलेले प्रतिनिधी यांची पुरेशी संयुक्त पथके नेमून हॉटेल/बार/रेस्टॉरंट यांना वेळोवेळी भेटी देऊन तपासणी करण्याचे आहे. ग्रामीण भागामध्ये महसूल विभागाचे अधिकारी / कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी / कर्मचारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी / कर्मचारी तसेच हॉटेल / बार / रेस्टॉरंट च्या संघटनेने उपलब्ध करुन दिलेले प्रतिनिधी यांची पुरेशी संयुक्त पथके नेमून नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर आवश्यक ती दंडात्मक कारवाई करण्याची आहे. पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुक्ल अधीक्षक  यांनी  नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

हॉटेल / बार / रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

सामान्य मार्गदर्शक तत्त्वे.

I. सर्व ग्राहकांची कोविड-19 च्या लक्षणांची तपासणी जसे की, तापमान (थर्मल गन वापरणे), खोकला, सर्दी इत्यादी प्रवेशद्वारापाशी करण्यात यावी.

II. केवळ लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा.

III. ज्यांचे तापमान 38.0 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त (100.4 फॅ) आणि / किंवा ज्यांना फ्लू सारखी लक्षणे असतील त्यांना प्रवेश देण्यात येवू नये. आस्थापनांनी अशा ग्राहकांची नोंद एका स्वतंत्र नोंद वहीमध्ये घेवून अशा ग्राहकांना/भ्यागतांना सहानुभूती पूर्वक प्रवेश नाकारण्यात यावा.

IV. प्रतिक्षेत असताना / सेवा देताना योग्य ते शाररीरिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल.

V. ग्राहकाकडून त्यांचे संपर्क क्रमांक व संपूर्ण माहिती प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेला आवश्यक असेल त्यावेळी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी संमत्ती घ्यावी.

VI. ग्राहकांना चेहऱ्यावर मास्क/ चेहरा कव्हर / मुखवटे वापरल्यासच आस्थापनेत प्रवेश देण्यात यावा. ग्राहकांनी आस्थापनेच्या आवारामध्ये चेहऱ्यावर मास्क/ चेहरा कव्हर / मुखवटे वापरणे बंधनकारक असेल. (जेवणा व्यतिरिक्त)

VII. ग्राहकांना वापरण्यासाठी हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करुन दिले पाहिजेत. अतिथींच्या वापरासाठी  आवारातील सर्व सार्वजनिक ठिकाणी ठेवणे आवश्यक असेल.

VIII. बिले अदा करताना शक्यतो संगणकीय प्रणालीचा वापर करणेसाठी प्रोत्साहीत करावे. रोकड व्यवहार करताना सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात यावी.

IX. विश्रांती गृह आणि हात धुण्याची ठिकाणे तपासणी व स्वच्छ करावीत व वापराच्या वारंवारतेवरुन निर्जंतुकीकरण करावे.

X. ग्राहक आणि कॅशियर / आस्थापनेतील कर्मचारी यांचेमधील संपर्क टाळण्यासाठीची नियमावली;

      अ. ग्राहकांशी वारंवार संवाद साधत असलेल्या काउंटरवर प्लेक्सीग्लास स्क्रीनसारख्या शारीरिक

           अडथळ्यांचा वापर करण्याचा विचार करावा.

      ब. शक्य असेल तर आगमन व निर्गमनासाठी वेगवेगळी व्यवस्था करावी.

XI. जे डिलिव्हरी चालक आणि इतर कंत्राटदार आवारात भेट देतात त्यांनी कर्मचाऱ्यांशी कमीत कमी संपर्क ठेवावा. शक्य असेल तेथे इलेक्ट्रॉनिक पेपरवर्क वापरा आणि स्वाक्षरीऐवजी पुष्टीकरणासाठी ईमेल चा वापर करावा किंवा डिलिव्हरीचा पुरावा म्हणून ऑनसाईटवरील वस्तूंचा फोटो घ्यावा.

XII. जेथे शक्य असेल तेथे खिडक्या उघड्या ठेवा आणि एचव्हीएसी यंत्रणा वापरण्याऐवजी हवा मोकळी राहील अशी यंत्रणा कार्यन्वित करावी. शक्य नसल्यास, एचव्हीएसी सिस्टमचे सतत निर्जंतुकीकरण करावे.

XIII. शक्य असल्यास आस्थापनेत शुध्द हवेचे प्रमाण वाढविण्यासाठी उच्च क्षमतेची यंत्रणा उभारावी. त्याच बरोबर उपलब्ध यंत्रणेमध्ये उच्च्‍ क्षमता असणारे एअर फिल्टर बसवावेत. बाहेरील शुध्द हवा खेळती ठेवणेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी.

XIV. निवासव्यवस्थेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे युनिट पूर्णक्षमतेने कार्यरत असणे आवश्यक आहे.

XV. आस्थापनेच्या ठिकाणी मुख्य वाहन तळ जर उपलब्ध असेल तर तेथील कर्मचारी फेस कव्हर / मास्क आणि हात मोजे घालून कार्यान्वित ठेवावेत. सदर कर्मचारी यांनी वाहनांचे स्टेअरिंग, डोअर हँडेल्स, चाव्या इ. निर्जंतुकीकरण करावे.

XVI. विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नष्ट करता येणाऱ्या मेनू कार्डचा वापर करावा. क्यूआर कोडद्वारे कॉन्टॅक्टलेस मेनूची शिफारस करावी.

XVII. कापडी नॅपकिन्सऐवजी, चांगल्या गुणवत्तेच्या डिस्पोजेबल पेपर नॅपकिन्सच्या वापर करणेस प्रोत्साहित करावे.

XVIII. संगणकीय प्रणाली द्वारे बिले / देयके अदा करणेसाठी ग्राहकांना विनंती करणेत यावी.

XIX. रेस्टॉरंट / बार यांची अंर्तगत रचना दोन टेबल मधील अंतर किमान 1 मीटर राहील अशी करावी.

XX. आस्थापनेत अतिथींना त्यांचे इच्छेनुसार जेथे बाटलीबंद पाणी किंवा वॉटर फिल्टरचे पाणी पुरवावे. बाटलीचा बाह्य भाग निर्जंतुकीकरण करावा.

XXI. मेनूमध्ये फक्त शिजवलेले अन्न अंर्तभूत करावे. कच्च्या (सॅलेड) किंवा कोल्ड फूडचा समावेश टाळावा.

XXII. अतिथी सेवा क्षेत्रे प्रत्येक शिफ्टच्या आधी आणि नंतर पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केले पाहिजेत. आस्थापनेतील फर्निचर व इतर साहित्य जसे की, टेबल, खुर्च्या, वर्कस्टेशन्स, बुफे टेबल्स, तागाचे इत्यादी वारंवार स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावे.

XXIII. बुफे सेवांना परवानगी असणार नाही.

XXIV. जेथे शक्य असेल तेथे प्री-प्लेटेड डिशेस मेनूमध्ये प्रोत्साहित करावेत.

XXV. प्रत्येक टेबलवर जेवण देणेसाठी विशिष्ठ कर्मचारी यांची नेमणूक करावी.

XXVI. क्रोकरी, कटलरी, हॅलोवेअर आणि सर्व्हिस वेअर इ. धुण्यासाठी गरम पाणी आणि फूड ग्रेड / मान्यता असलेल्या जंतुनाशकांचा वापर करावा. 

XXVII. सेवा देणारी उपकरणे वेगळी आणि निर्जंतुकीकरण केलेल्या कपाटांमध्ये संग्रहित केली जावीत.

XXVIII. शक्य असेल तर अन्न आणि क्रोकरी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे वॉर्मर चा वापर करावा.

XXIX. वापरलेली ताटे तात्काळ भांडी धुण्याच्या भागात न्यावीत. जेवण घरातील साईड बोर्डवर ठेवून शिल्लक राहीलेले अन्न निश्चित केलेल्या झाकन युक्त डब्यामध्ये टाकावे. कचरा दररोज नष्ट करणेत यावा.

XXX. अन्न व पेयपदार्थ यांची सामग्री व त्यांचे स्वच्छतेसाठी एचएसीसीपी / आयएसओ / एफएसएसएआय मानकांचे / दर्जा पाळणेत यावा.

XXXI. रोखपालांना (कॅशियर) नियमित हातांचे निर्जंतुकीकरण करणेबाबत सुचना देणेत याव्यात.

XXXII. सर्व प्रकारच्या प्रवेश दारावर ग्राहकांनी सॅनिटायझरचा वापर करणे व जेवण / पित नसताना मास्कचा वापर करणेबाबत सुचना फलक लावणेत यावेत.

XXXIII. आस्थापनेच्या ऑनलाईन केंद्रावर (उदा. संकेतस्थळे, सोशल मेडिया इ.) सुविधा उपलब्धतेचे तास, मुख पट्ट्यांच्या वापराची आवश्यकता, पुर्व मागणी / पुर्वादेश (Preordering) संदर्भातील धोरण, आरक्षण पुर्व देयक अदाई, उचल आणि / वितरण आणि इतर अनुषंगीक बाबी संदर्भात स्पष्ट सुचना उपलब्ध करुन द्याव्यात.

XXXIV. तोंडावरील मास्क स्वच्छ करावेत / वापरानंतर, खराब अथवा घाण झाले असल्यास बदलावेत. एकमेकांचे मास्क वापरु नये. खराब झालेल्या मास्कची साठवणूक व विल्हेवाट योग्य रितीने करावी.

XXXV. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने वैयक्तीक ग्राहक अथवा ग्रुप मधील एकाचे नांव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी दैनंदीन नोंदी तारीख व वेळ यासह 30 दिवसांपर्यंत जतन करुन ठेवावे.

XXXVI. करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल. तसेच बिलीर्यडस, डार्टस, व्हीडीओ गेम्स आदी गेम क्षेत्र प्रतिबंधीत असेल. बंदीस्त आणि खुल्या जागेतील कार्ड रुम्स प्रतिबंधीत असतील.

XXXVII. ज्या ठिकाणी ग्राहकाने स्वत: सेवा काऊंटरवर मागणी केली असेल अशा एखाद्या भागाचे प्रदर्शन वगळता सर्व वस्तूंच्या नमुने देणे व प्रात्यक्षिक देणे थांबवण्यात येईल / बंद राहील.

XXXVIII. सर्व आस्थापनांनी खालील बाबी करणे बंधनककारक राहील

·   आस्थापनामधील सर्व कर्मचाऱ्यांच्या नियमित कोविड तपासण्या करणे.

·   सर्व कर्मचारी व ग्राहकाकडून एन 95 / तत्सम मुख पट्टया वापरल्या जातील याची दक्षता घेणे.

·   दिवसातून दोनवेळा परिसराचे निर्जंतुकीकरण करणे.

·   जेथे शक्य असेल तेथे कोविड शिष्टाचार (नियमावली) चे पालन करत असलेचे सीसीटीव्ही रेकॉर्ड ठेवणे.

5.2. जेवण सुविधा

5.2.1 येण्या पुर्वी

I. गर्दी टाळण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाण्यापूर्वी ग्राहकांना / अतिथींना अगोदर आरक्षण करण्यास प्रोत्साहित केले जावे. प्रतीक्षेच्या बाबतीत शारिरीक अंतरांच्या निकषांसह नियुक्त केलेल्या प्रतीक्षा क्षेत्रात ग्राहकांना बसवावे.

II. आस्थापनेत प्रवेश द्यावयाच्या व्यक्तींची संख्या कर्मचाऱ्यांमार्फत आधीच घेवून त्यानुसार सामाजिक अंतर राखणारी बैठक व्यवस्था केली जावी. 

III. ग्राहकांना / अतिथींना पुर्वी कळविलेली संख्या बदलणार नाही आणि काही कारणाने संख्या बदलणार असल्यास त्याच आगावू सूचना देण्याबाबत विनंती करावी.

IV. ग्राहकांना / अतिथींना त्यांचे स्वत: चे फेस मास्क, हँड ग्लोव्हज आणि इन्स्टंट हँड वॉश इत्यादी सोबत बाळगण्याची विनंती करावी.

V. ग्राहकांना /अतिथींना थेट बाहेरून कोणतेही अन्न व पेयपदार्थ न आणणे बाबत विनंती करावी.

5.2.2 आगमन

I. शक्यतो, जेवण सुविधेचे गेट / दरवाजा परिचारा मार्फत उघडले जाईल हे पहावे.

II. शक्य असेल तर ग्राहकांना प्रवेश करणारा दरवाजा उघडा ठेवावा. तो स्वयंचलित किंवा नेमून दिलेल्या कर्मचारी यांनी त्याचे परिचलन करावे. ग्राहकांसाठी हँड सॅनिटायझर्स ठेवावे.

III. प्रवेशद्वारावर आणि वॉशरूमसारख्या इतर ठिकाणी हँड सॅनिटायझर्स / पेडल सॅनिटायझर लावावे. ग्राहकांना बसायच्या जागेवर जाण्यापूर्वी हात स्वच्छ करण्याचे निर्देश द्यावेत.

IV. खानावळीमध्ये आलेनंतर व जाताना ग्राहकांना हात निर्जंतुकीकण करण्याचे स्मरण करुन द्यावे.

V. आवश्यक तेथे शारिरीक अंतराचे पालन करणेसाठी जमिनीवर खुणा करणेत याव्यात / आखणी करणेत यावी.

VI. इतर अतिथी / ग्राहक किंवा क्षेत्र बाधित होवू नये याची दक्षता घेवून नियोजनबध्द रित्या कुटूंबांना / समुहाला टेबल / बैठक व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी.

VII. परवानगी असलेल्या बैठक क्षमते इतक्याच लोकांना उपहार गृह / मद्य गृहे, जेवण सुविधा येथे आत प्रवेश देणेत यावा.

VIII. ग्राहकांना हस्तांतरीत होणारे पुर्नवापर योग्य मेनू स्वच्छ आणि निर्जंतुक केले जावेत. स्थिर मेनू फलक इलेक्ट्रॉनिक मेनू / भ्रमणध्वनीवर डाऊन लोड करणेत येणार मेनू इ. पर्यायांचा विचार करणेत यावा. 

IX. बाह्यस्थ ग्राहक बैठक क्षेत्रे प्रत्येक वापरानंतर स्वच्छ व निर्जंतुक करणेत यावेत. टेबल्स आणि टेबलावरील अन्य साहित्य ग्राहकादरम्यान स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करावे.

X. ताटे / बशा, पेले, थाळ्या मेनू, मसाले किंवा इतर टेबलावर मांडायचे साहित्य ग्राहक बसण्याअधी टेबलावर मांडू नये. हे सर्व साहित्य ग्राहक बदला दरम्यान पूर्णत: निर्जंतुकिकरण करणेत यावेत. तसेच जेव्हा त्यांचा वापर नसतो तेव्हा दुषित होणार नाही अशा ठिकाणी जतन करून ठेवणेत यावे.

5.3. अन्न आणि पेय (F & B) उत्पादन आणि सेवा

I.  हॉटेलच्या स्वयंपाकघरात अन्न तयार करावे.

II. जर हॉटेल मध्ये स्वयंपाकघर नसेल तर हॉटेल मालकाने / चालकाने त्यांच्या अस्तित्वातील पुरवठाधारका कडून जेवण पुरवठा घेण्यात यावा.

III. आस्थापनेने अथितींच्या उपहारगृहे / कॅफे / खाद्य पदार्थ आऊट लेट मधील वावर मर्यादित करणेसाठी शिष्टाचार / नियमावली निश्चित करावी.

IV. अन्न घरपोच सेवेबाबत पोच करणाऱ्या व्यक्तीने अन्नाचे पाकीट ग्राहकांच्या दारात ठेवावे व प्रत्यक्ष ग्राहकांना हस्तांतरीत करु नये.

V. उपहारगृहे अधिकाऱ्याद्वारे घरपोच सेवा देण्यासाठी पाठविण्यापूर्वी संबंधीत कर्मचाऱ्याची तपासणी थर्मल स्कॅनर द्वारे करावी.

 

5.4 – कर्मचारी प्रशिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना

I . सामाजिक अंतरांचे योग्य निकष पाळणे, स्वच्छता, निर्जुतुकीकरण, आणि आरोग्य विषयक करावयाच्या उपाययोजना याबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करणे जेणेकरून पर्यटक त्याचबरोबर कामावरील कर्मचारी यांचेदेखील संरक्षण होईल.

II.  सर्व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शक सूचनांबाबत व प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत प्रशिक्षण देणे त्याचबरोबर हॉटेल/ रेस्ट्रारंटच्या ठिकाणी प्रशिक्षणांची रंगीत तालीम आयोजित करणे.

III. वैयक्तिक आरोग्य, शारिरिक अंतर आणि स्वच्छता याबाबी कर्मचारी प्रशिक्षणामध्ये पूर्ण करणे. सर्व कर्मचारी वर्गाला पर्यटकाबाबत घ्यावयाच्या काळजीसाठी खालीलप्रमाणे प्रशिक्षीत करणे.

अ)   शारिरिक अंतरामध्ये प्रवासी त्याचबरोबर सर्व कर्मचारी यांनी एकमेकाला आलिंगन देणे, हस्तांदलोन करणे या बाबी टाळणेबाबतची खबरदारी घेणे. त्याचबरोबर सर्वामध्ये योग्य शारिरिक अंतर राखणे, आणि खोकला व सर्दी असणाऱ्यांपासून दूर राहणे.

      ब)  वेळोवेळी तसेच शक्य त्या वेळी अल्कोहोल युक्त Hand Sanitizers  (कमीत कमी 20 सेकंदापर्यत) चा

            वापर करणे.

      क) डोळे, नाक, आणि तोंड यांना स्पर्श करणेचे टाळावे. त्याचबरोबर पाहुणे/ प्रवासी यांचेसोबत वस्तुंच्या

            देवाणघेवाणीनंतर (जसेकी रुपये, क्रेडीट कार्डस इत्यादी) हाताचे निर्जुतुकीकरण करणे.

ड)  नाक व श्वासोश्वासाविषयीचा शिष्टाचार कडकपणे पाळणे. जसेकी खोकतांना किंवा शिंकताना नाक व

      तोंड हे टिश्यू पेपर/ रुमाल/ कोपर वळवून पूर्ण झाकले जाईल याची खबरदारी घेणे. व वापरलेला टिश्यू  

      पेपरचा तात्काळ झाकण असलेल्या डस्टबिनमध्ये टाकून त्याची योग्य पध्दतीने विल्वेवाट लावणे.

IV. हॉटेल/ रेस्ट्रारंट मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि कोव्हीड -19 आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य सेवा मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेशी संपर्क करणे.

V. कामाच्या ठिकाणी प्रवेश करणेपूर्वी सर्व कर्मचारी यांची तपासणी करणेत यावी. सदर तपासणीमध्ये खोकला, श्वास घेताना त्रास होणे , ताप आणि थंडी त्याचबरोबर कर्मचारी यापूर्वीच्या 14 दिवसांमध्ये कोव्हीड 19 ने बाधित रुग्णांच्या संपर्कात आला आहे अगर कसे? याबाबतच्या नोंदी ठेवणेत याव्यात. कर्मचारी वर्गाची प्रवेश करतानाच तपासणी हि दुरस्थपणे किंवा वैयक्तिकरित्या करणेत यावी. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी वेळोवेळी शरीराचे तापमान पाहणेत यावे.

5.5 – उपहारगृहमधील कर्मचाऱ्यांकडून वापर केलेल्या वैयक्तिक सुरक्षेतेच्या साधनाबाबत

I. चांगल्या प्रतीचे नष्ट करण्याजागे हॅण्डग्लोज व मास्क वापरणेत यावे.

II. वैयक्तिक सुरक्षेसाठी वापरलेले साधने ही प्लास्टिक बँगमध्ये सिलबंद करून व त्यावरती संसर्गजन्य टाकाऊ वस्तु असे नमूद करावे.

III. शारिरिक अंतराबाबत पद्धतीचा अवलंब होतो याबाबत संनियंत्रण करणेसाठी जवळच्या ग्राहकांपासून किमान 6 फूट अंतरावर मुखपट्टी परिधान केलेला एक कर्मचारी दाराजवळ शक्य असल्यास नियुक्त करावा. शारिरिक अंतर ग्राहक व कर्मचारी जेथे रांगेत असतील तेथे राखले जाते का? याची खात्री करावी. यामध्ये Stand व Terminals,  काऊंटर, रांगा, विश्रांतीकक्ष, लिफ्टचा परिसर, अभ्यागत कक्ष व प्रतिक्षा कक्ष, Valet drop off and Pickup त्याचबरोबर ग्राहक एकत्रित येणारे कोणतेही ठिकाण याचा समावेश असेल.

IV. ग्राहक तसेच इतर लोक एकत्रित येणाऱ्या ठिकाणी (जसेकी रांगा, थांबणेचे ठिकाण) शारिरिक अंतर राखणेसाठीच्या खुणा करणेत याव्यात.

5.6 – बार साठीच्या सुरक्षा उपाययोजना

I.  बार मधील कॉऊटंर आणि बसणेच्या जागा या व्यवस्थितपणे निर्जुतुकीकरण करणे (बसणेच्या ठिकाणी शारिरिक अंतराचे निकष पाळले जातील). बार मधील साधने जसेकी, Shakers, Blenders, Mixers and Peg Measures स्वच्छ करणे. 

II. बर्फ ठेवावयाचा कंन्टेनर, ट्रॉली ही स्वच्छ व निर्जुतुकीकरण करणे.

III. अन्न धान्यासाठी वापरणेत येणाऱ्या जंतुनाशकाचा वापर करून सर्व स्पिरीट, वाईनस, आणि बियर च्या बाटल्या निर्जुतुकीकरण करणे.

IV. बारमध्ये वापरणेत येणाऱ्या काचेच्या वस्तु (ग्लास) या गरम पाणी किंवा लिंबू वापरून स्वच्छ करणे.

V. उघडणेत आलेली पेये यावर FSAI च्या मार्गदर्शक सूचनांनूसार दिनांक नमूद करणे.

5.7 – स्वयंपाकगृह व अन्नधान्य शिजवणाचा परिसर  

I.   वापर करणेत येणाऱ्या स्वयंपाकगृहामध्ये वेळोवेळी निर्जुतुकीकरण करणे.

II.  स्वयंपाकगृहामध्ये शारिरिक अंतर राखले जाईल, याबाबतचे नियोजन करणे.

III.  कामाच्या ठिकाणचे टेबलांची रचना कर्मचारी समोरासमोर येणार नाहीत व योग्य शारिरिक अंतर राखले जाईल अशाप्रकारे करणेत यावी.

IV.  सर्व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक सुरक्षेतेची साधने,  Face Masks, Chef Caps, Net Caps व  Face Shied यांचा वापर करणे.

V. अंदाजे 100 ppm क्लोरीन मांसाहारी आणि 50 ppm क्लोरीन शाकाहारी वस्तुंच्या निजर्तुकीकरणासाठी वापरावे.

VI.  HAACP/ ISO/ FSSAI  यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे सक्तीने पालन केले जाईल आणि या मार्गदर्शक सूचनांनूसार निर्जुतुकीकरण, स्विकारणेच्या ठिकाणची स्वच्छता, साठवणूक आणि अन्न शिजवणेच्या ठिकाणची स्वच्छता राखली जाईल याची काळजी घेणेत यावी.

VII. कमीत कमी कर्मचाऱ्यांचा वापर करणे, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या टिम तयार करणे, जेणेकरून कर्मचाऱ्यांचा संपर्क कमीत कमी राखला जाईल.

VIII. सर्व कर्मचाऱ्यांनी नष्ट करण्याजोगी वैयक्तिक सुरक्षेतेची साधने जसे की, ग्लोव्हज, हेअर नेटस आणि इतर सुरक्षाविषयक साधनांचा वापर करावा.

IX. कमीत कमी मेन्यू वापर करणेचा सल्ला देणे आणि तात्काळ वितरण करणे.

X. स्वयंपाकगृहामध्ये वापरावयास आलेल्या भाज्या, मटण आणि इतर आवश्यक वस्तु यांची स्वच्छता व निर्जुतुकीकरण ही योग्य मान्यताप्राप्त अन्न धान्य निर्जुतुकीकरण साधनांचा वापर करून करणे.

XI.  स्वयंपाकाची साधने, पळया इत्यादीची स्वच्छतेसाठी ऑटोक्लेव्ह मशीनचा वापर करणे.

XII. अन्नपदार्थाशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही यासाठी अन्नपदार्थ वितरण करणाऱ्या कर्मचारी यांनी हात स्वच्छ धुणेबरोबरच अन्नपदार्थ वाढणेसाठी चिमटे, हातमोजे, भांडी यांचा वापर करणे. विषाणू हा उष्ण तापमानास अकार्यक्षम होतो, त्याअनुषंगाने अन्नपदार्थ शिजवणे. त्याचबरोबर न शिजवलेले अन्नपदार्थ वाटप करताना अन्न्पदार्थाशी संपर्क येणार नाही यादृष्टीने हातमोजे व इतर साधनांचा वापर करणे.

XIII. शिजवलेले अन्नपदार्थ हे उघडयावर न ठेवता पुर्णपणे झाकले जाईल याची काळजी घ्यावी.

XIV.  शिजवलेले अन्नपदार्थ हे ग्राहकांना वाढताना पुरेसे अंतर्गत तापमान राखले जाईल याविषयी दक्षता घेणे.

अ. उष्ण शिजवलेले पदार्थ जे जलद थंड होतात, रेफ्रीरेजटरमध्ये थंड केलेल्या, अथवा वेगाने थंड केलेच्या प्रक्रिया वापरलेले (जसे की बर्फ, आणि Cooling wands) पदार्थाचे तापमान तपासणे

ब. अन्नपदार्थ साठविणे, ग्राहकांनी देणेसाठी ठेवणे अथवा ग्राहकांना वितरित करणे यामधील वेळ कमीत कमी करणे.

XV.अन्नपदार्थ वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन व दिलेल्या कर्तव्याबाबतचे प्रशिक्षण देणे जेणेकरून ग्राहकांना अन्नपदार्थ वितरित करताना, निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे पालन करतील.

XVI. अन्नपदार्थाची वाहतूक करताना गरम अन्नपदार्थ गरम व थंड अन्नपदार्थ थंड राखणेसाठी विहित साधानांचा वापर करणे.

अ.    Coolant साधने (जसेकी Gel Packs) वापरून थंड पदार्थ हे थंड ठेवावेत.

ब. उष्णता रोधक साधनांचा वापर करून गरम पदार्थ हे गरम ठेवावेत.

XVII. संसर्ग टाळणेसाठी अन्नपदार्थ हे स्वंतत्र ठेवावेत जसेकी न शिजवलेले पदार्थ हे शिजवलेल्या अथवा खाण्यासाठी तयार असलेल्या अन्नपदार्थापासून वेगळे ठेवावेत.

XVIII. वाहतुकीदरम्यान होणारा अन्नपदार्थास संसर्ग टाळणेसाठी योग्य पध्दतीने पॅकेजींग करणे.

5.8 – टाकाऊ पदार्थ विल्हेवाट करावयाच्या मार्गदर्शक सूचना

I.  टाकाऊ पदार्थ हे वेगवेगळे करावेत, (जसेकी  ओला, सुका, काचेच्या वस्तु व जैविकदुष्टया कुजणाऱ्या ) 

II. टाकाऊ पदार्थ वेगळे करताना सुरक्षेतेची साधने (मास्क, ग्लोज) यांचा वापर करावा.

5.9 – कर्मचारी वावरत असलेल्या परिसराबाबतच्या मार्गदर्शक सूचना

I. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या कॅन्टीन, लॉकर्स, चेंजीग रुम इत्यादी ठिकाणी एका वेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत याप्रमाणे वेळापत्रक तयार करावेत.

II. कर्मचाऱ्यांना सार्वजनिक / हॉटेल वाहतुक व्यवस्थेचा वापर न करता, स्वत: च्या वाहनांचा वापर करणेसाठी प्रेरित करावे.

III. ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात लोक एकत्र येतात, रांगा असतात, अशा ठिकाणी योग्य शारिरिक अंतर राखले जाईल यासाठी मार्कीग करणेत यावे.

IV. हॉटेल परिसरामध्ये चालताना, फिरताना कर्मचारी, ग्राहक यांची जास्त्‍ गर्दी होऊ नये, यासाठी  स्वतंत्र दिशादर्शक मार्ग निश्चित करावे, जेणेकरून कर्मचारी, ग्राहक जात असताना समोरासमोर येणेच प्रमाण कमी असेल.

V. अन्नपदार्थ नेणेसाठी येणाऱ्या ग्राहकाबाबत ऑडर देणे व ते घेवून जात असताना योग्य शारिरिक अंतर राखले जाईल, यासाठी रांगा केल्या जाव्यात.

VI. रेस्ट्रारंट/ कल्ब मध्ये ग्राहकांना बसणेसाठी केलेल्या विविध टेबलची व्यवस्था ही योग्य शारिरिक अंतर राखले जाईल यादृष्टीने करणेत यावी. (हॉटेल परीसरामध्ये स्वतंत्र रिकामा परिसर असल्यास त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मान्यतेने वापर करावा)

VII. व्यक्ती व्यक्तीमधील संपर्क कमीत कमी करणेसाठी जेथे शक्य असेल तेथे तांत्रिक सुविधेचा वापर करावा.

अ.    ग्राहक आलेनंतर त्यांचेसाठी मोबाईल व्दारे ऑर्डर घेणे, मेन्यू कार्ड उपलबध करणे, Text SMS, संपर्क न येता ऑनलाईन पेंमेंट करणे या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

ब. ग्राहकांसाठी कमीत कमी संपर्क येण्याच्या दृष्टीने अन्नपदार्थ ऑर्डर देणे व नेणेसाठी जेथे शक्य असले तेथे स्वतंत्र तांत्रिक सुविधेचा वापर करावा.

VIII. जेथे शक्य असेल तेथे फोनव्दारे आरक्षण करणेबाबतचे सुविधा निर्माण करावी जेणेकरून ग्राहक रांगेत थांबतील अथवा त्यांच्या वाहनामध्ये थांबवून फोन कॉल, Text SMS व्दारे टेबल उपलब्ध असलेची माहिती मिळाल्यानंतर प्रवेश करतील.

IX. हॉटेल आस्थापनाची क्षमता असलेस ऑनसाईट ऑर्डरची सुविधा, ग्राहकांना एकदाच वापर केला जाईल याबाबतचे मेनू कार्ड उपलब्ध करावेत जेणेकरून तात्काळ ऑर्डर दिली जाईल. त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये अन्नपदार्थ आवेष्टीत करून दिले जातील. त्याचबरोबर ग्राहकांना ऑडर तयार असलेबाबतचे निर्धारित वेळ निश्चित करून देणे.

X. कर्मचारी, ग्राहक यांना बाथरूम, मार्गीका, बार परिसर, केंडीट कार्ड टर्मिनल या गर्दीच्या ठिकाणचा कमीत कमी वापर करणेसाठी सुचित करणे.

XI. ऑफीस परीसर, स्वयपाक गृह, अन्नधान्य ठेवणेची जागा जास्त घनता किंवा जास्त कर्मचारी एकत्र येण्याचा परिसर यामध्ये योग्य शारिरिक अंतर राखणेबाबतच्या सुचनांबाबतचे पालन करणेत यावे.

XII. कर्मचाऱ्यांच्या अपघाताने येणारा संपर्क अपेक्षीत आहे. परंतू सदर संपर्क हा 15 मिनिटापेक्षा कमी म्हणजेच 10 मिनिटा पर्यत असावा आणि या दरम्यान कर्मचाऱ्यांनी फेस मास्क वापरणे आवश्यक आहे.

 

5.10 – कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीबाबत मार्गदर्शक सूचना

I. वाहनांमध्ये चढण्याअगोदर सर्व कर्मचारी वर्गाचे तापमान आणि व इतर लक्षणांची तपासणी करणे.

II. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसलेस अथवा त्यामध्ये शारिरिक अंतर न पाळता गर्दी असलेस आस्थापनेनी स्वताची वाहतुक व्यवस्था करावी.

III. आस्थापनामध्ये आवश्यक तितका कमीत कमी कर्मचारी वर्ग उपस्थित ठेवणे.

5.11 – कर्मचारी वर्गाच्या गणवेशाबाबत मार्गदर्शक सूचना

I.  कर्मचारी वर्ग वापरत असलेला गणवेश दररोज बदलणे बंधनकारक आहे.

II. गणवेश हा योग्य पध्दतीने धुणे, Steam Press अथवा गरम इस्त्रीचा वापर करून निर्जुतुकीकरण करणे.

III.  सर्व कर्मचारी वर्गाला गणवेशाचा भाग म्हणून वैयक्तिक सुरक्षेची साधने ( मास्क, हॅण्डग्लोज) पुरविणे.

IV.  गणवेश बदलत असताना कर्मचारी वर्ग पुरेसे शारिरिक अंतरांचे पालन करत आहेत याची दक्षता घेणे.

5.12 – कर्मचाऱ्यांच्या जेवण सुविधेबाबतच्या मार्गदर्शक सूचना

I. कर्मचाऱ्यांचे जेवणाच्या वेळेचे योग्य नियोजन करणे जेणेकरून शारिरिक अंतराचे बंधन योग्य पध्दतीने पाळले जाईल्‍.

5.13 – कर्मचाऱ्यांना संसर्ग झालेस करावयाच्या उपाययोजना

I.  दररोज सर्व कर्मचारी वर्गाची तापमान व इतर लक्षणाबाबत तपासणी करणे.

II. कर्मचारी वर्गाबाबत खोकला, थंडी, ताप, सर्दी या लक्षणाबाबतची सर्व नोंदी अद्यावत ठेवणे.

III. जर कर्मचारी वर्गातील एखाद्या व्यक्तीस श्वास घेणेस अडचण येत असल्याचे लक्षणे आढळल्यास सदर कर्मचाऱ्यास तात्काळ काम बंद करून आरोग्य विषयक मदत उपलब्ध करून देणे. सदर कर्मचाऱ्यास स्वतंत्र राहणेबाबत सूचना देणे, त्याचबरोबर पुढील उपचाराबाबत स्थानिक आरोग्य प्रशासनास कळविणे.

IV. जे कर्मचारी घरामध्ये थांबलेले आहेत आणि ज्यांना श्वासोश्वासाबाबत अडचण येत असल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून उपचार घेणेबाबत सूचित करावे.

V. जे कर्मचारी घरामध्ये थांबलेले असून ज्यांचा अहवाल कोव्हीड -19 +ve आलेला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्याबाबत स्थानिक प्रशासन आरोग्य यंत्रणेला कल्पना देऊन डॉक्टरांच्याकडून उपचार विषयक प्राप्त झालेल्या सूचनेनूसार राहणे. तसेच जोपर्यत लक्षणे कमी होऊन कोव्हीड -19 –ve अहवाल येत नाही तोपर्यत घरामध्ये विलगीकरणामध्ये राहणेबाबत सूचना कराव्यात.

VI. जर आपले आस्थापनामध्ये कर्मचारी कोव्हीड-19 +ve आलेस संपूर्ण परिसर अंतर्गत स्वच्छता आणि धुरीकरण करून निर्जुतुकीकरण करणे.

VII.  या अनुषंगाने सर्व कर्मचारी वर्गाचे कोव्हीड -19 चाचणी घेऊन लक्षणे तपासणे.

हॉटेल / बार / रेस्टॉरंट मध्ये शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर करणेत येणाऱ्या दंडात्मक कारवाई बाबत.

 

1) मार्गदर्शक सूचनांचे (SOP) काटेकोरपणे पालन करुन संबंधितांनी आपला व्यवसाय करणेचा आहे. सदर व्यवसाय करत असताना कोणत्याही स्वरुपात कोरोना (कोविड-19) चा प्रसार होणार नाही, संसर्ग वाढणार नाही याबाबत संपूर्णपणे दक्षता घेणेची आहे. सदर विहीत मानक कार्यप्रणालीचा (SOP) चा भंग प्रथमत: निर्दशनास आल्यास, दंडाची रक्कम रु. 2,500/- असेल. द्वितीय भंगावेळी सदर दंडाची रक्कम रु. 5,000/- असेल, तर तिसऱ्यांदा SOP चा भंग झाल्याचे निर्दशनास आल्यास रक्कम रु. 7,500/- दंड आकारणेत यावा.

2) उपरोक्त दंडात्मक कारवाईसोबतच सक्षम अधिकारी हे ज्या हॉटेल / बार/ रेस्टॉरंट मध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसेल व कोविड-19 संसर्ग वाढण्यास मदत होत असेल अशा व्यवसायिकांच्या हॉटेल / बार परवाना आवश्यक त्या कालावधीसाठी निलंबित करणेचे आदेश संबंधित सक्षम अधिकारी यांनी राहतील.

3) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाद्वारे बारची तपासणी करताना, मुंबई विदेशी मद्य अधिनियम, 1953 व अन्य अनुषंगिक नियमावली या भंग करणाऱ्या व्यवसायिकांवर तसेच ग्राहकांवर मुंबई विदेशी मद्य अधिनियम, 1953 अंतर्गत दंडात्मक कारवाई करणेत यावी. सदर कारवाई करीत असताना असे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. याबाबत प्रथम भंगाबाबत रु. 10,000/-, द्वितीय भंगाबाबत रु. 25,000/- व तिसऱ्यांदा उपरोक्त अधिनियम व नियमावली अंतर्गत भंग झाल्याचे निदर्शनास आलेस, रक्कम रु. 50,000/- दंड आकरणेत यावा. तसेच वारंवार नियम भंग करणाऱ्या बारचा परवाना निलंबित करणेबाबतही कडक कारवाई करणेत यावी व आवश्यकतेनुसार वारंवार नियम भंग करणाऱ्या बारचा परवाना रद्द करणेची कारवाई करणेत यावी. 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.