इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूध्द एसीबीकडे तक्रार करा तक्रारदाराच्या शासकीय कामाचा पाठपुरावा करू -पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत

 



 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : लाच -लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली म्हणून तक्रारदाराचे कोणतेही काम थांबणार नाही. त्याचा पाठपुरावा विभागामार्फत केला जाईल त्यामुळे शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूध्द एसीबीकडे निर्धास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले.

       सतर्क भारत, समृध्द भारत’ ही संकल्पना घेवून केंद्रीय दक्षता आयोगातर्फे उद्या दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने पोलीस उप अधीक्षक श्री. बुधवंत म्हणाले, उद्या मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे भ्रष्टाचार विरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आठवडी बाजाराच्या ठिकाणी माहिती पत्रकाच्या आधारे जनजागृती करण्यात येणार आहे.

          लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली म्हणून आपले काम होणार नाही, अशी कोणतीही भीती नागरिकांनी बाळगू नये. त्यांचे शासकीय काम नियमानुसार होत असेल तर ते करून देण्याची जबाबदारी लाच लुचपत विभागाची आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. शासकीय काम करण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी, लोकसेवक लाच मागणी करत असेल तर नागरिकांनी निर्धास्तपणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 7083668333, 9011228333, 0231-2540989 आणि 7875333333 या व्हॉट्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बुधवंत यांनी केले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.