बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

चाईल्डलाईन संस्थेच्या कामाच्या जनजागृतीस मदत करा -निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे

 




कोल्हापूर दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  समाजात मुलांच्या समस्या खूप वाढत आहेत. या  समस्या सोडविण्यासाठी चाईल्डलाईनची खूप मदत होते. चाईल्डलाईनच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामाची व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी संस्थेस मदत व जनजागृती करण्यास मदत करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले.

चाईल्डलाईन सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी  श्री. गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  बैठकीस सांगली मिशन सोसायटीचे सामाजिक कार्य व विकासचे संचालक फादर रोशन  वर्गीस, फादर लिज्जो, बालकल्याण समितीचे सदस्य श्री. व्ही.बी.शेटे, दिलशाद मुजावर, बाल न्याय मंडळाच्या प्रियदर्शनी चोरगे, चाईल्ड लाईनच्या केंद्र समन्वयक अनुजा खुरंदळ यांच्यासह संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

चाईल्डलाईन हा भारत सरकारच्या  केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. चाईल्ड लाईन या संस्थेमार्फत दरवर्षी लैगिंक शोषणास बळी पडलेल्या, हरवलेल्या, वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या, अनाथ, निराधार बेवारस, बाल कामगार, बालविवाह, भावनिक आधाराची गरज असलेल्या व निवाऱ्याच्या शोधात असलेल्या अशा विविध घटकातील मुलांना आधार दिला जातो.

            मुलांच्या मनातील भीती बाहेर काढण्याची काम चाईल्ड लाईन संस्थेमार्फत होत असून हे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामास सर्व यंत्रणांचे सहकार्य मिळाल्यास संस्थेमामार्फत मदतीची गरज असलेल्या मुलांपर्यंत तातडीने पोहचणे शक्य होणार आहे. चाईल्ड लाईन संस्थेनेही त्यांच्यापर्यंत आलेल्या तक्रारी प्रथम स्थानिक पातळीवर पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामसेवक व पोलीस पाटील यांची मदत घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी बैठकीत सांगितले.

            चाईल्ड लाईन संस्थेमार्फत गरजू मुलांना 1098 क्रमांकावरुन मदत केली जात असल्याचा बाबतचा फलक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत लावावा. शहरातील मोठे घरकुल प्रकल्प, मोठी अपार्टमेंट अशा ठिकाणीही  1098 क्रमांकावरुन मदत केली जात असल्याचा फलक दर्शनी बाजूस लावावा, अशी विनंती दिलशाद मुजावर यांनी केली.

            चाईल्डलाईनच्या केंद्र समन्वयक अनुजा खुंदळकर मुलांनी त्यांच्या हक्कासाठी लढले पाहीजे, मुले ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे, ती सांभाळली पाहीजे, कधीही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास मुलांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.