राधानगरी तालुक्यातील राशिवडे
येथील अतुल पाटील आणि त्यांची पत्नी अमृता पाटील यांनी लॉकडाऊनचा उपयोग शेतीसाठी
चांगल्या प्रकारे केला. 23 गुंठ्यात आल्याचे पीक घेऊन महिला शेतमजुरांना रोजगार तर
मिळवून दिलाच, शिवाय मिरचीच्या आंतरपिकाने आल्याच्या लागवडीचा खर्चही भरून काढला.
सर्वप्रथम 22
मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू झाला आणि त्यानंतर दोन दिवसातच लॉकडाऊनला सुरूवात
झाली. या काळात उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने रोजगार ठप्प झाला होता. बसून करायचे
काय? याच विचारातून 23 गुंठ्याचा आल्याचा प्लॉट करण्याचा निर्णय घेतला. असे सांगून
अतुल पाटील म्हणाले, या निर्णयामुळे महिला शेतमजुरांनाही रोजगार
निर्माण होणार होता. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार सर्व नियमांची अंमलबजावणी
करत 23 गुंठ्यामध्ये आल्याची लागवड केली. यामुळे महिलांनाही काम मिळाले आणि
आम्हाला मिरचीचे चांगले उत्पन्न मिळाले.
शेणखत, जीवमृत,
दशपर्णी अर्क, काही प्रमाणात रासायनिक खते याचा वापर केला. या लागवडीचा सर्व खर्च भरून निघण्यासाठी आंतरपिक
म्हणून सितारा गोल्ड जातीच्या मिरचीचे उत्पन्न घेतले. आजपर्यंत मिरचीचे पाच तोडे
झाले असून यापासून 80 ते 100 किलो मिरची मिळाली. आले लागवडीपासून तीन ते साडेतीन
लाख रूपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊनमुळे
महिलांना रोजगार कमी झाला होता असे सांगून अमृता पाटील म्हणाल्या, आले पीक
घेण्याच्या निर्णयामुळे हा रोजगार निर्माण झाला. सामाजिक अंतर राखत शेतीची सर्व
कामे पूर्ण केली. सॅनिटायझर, मास्क याचाही वापर करण्यात आला. भविष्यातही
आल्यापासून आले पेस्ट, सुंठ पावडर अशी उत्पादने करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
त्यामधून रोजगार निर्मिती विशेषत: महिलांसाठी काम देण्याचा आमचा विचार आहे.
शिरोली दुमालाच्या संजय पाटील यांनीही
कुटूंबाच्या मदतीने लावले आले
करवीर
तालुक्यातील शिरोली दुमाला येथील शेतकरी संजय पाटील यांनीही 1 एकर क्षेत्रात
आल्याचे पीक घेतले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्याने शाळा, कॉलेजेस बंद झाले. याचा उपयोग
शेती कामासाठी मी करून घेतला. मुलांसह भाऊ, त्याची पत्नी, आई-वडील यांच्या समवेत
आल्याची लागवड केली. यामुळे शेतमजुरांचा खर्चही कमी झाला आहे. आळवण्या, फवारण्या,
खुरपणी या सर्वांचा खर्च निघून जाण्यासाठी आंतरपिक म्हणून सितारा गोल्ड जातीची
मिरची लावली. प्रत्येक आठवड्याला 100 किलो मिरची मिळते. स्थानिक बाजारपेठेत विक्री
करतो.
रासायनिक
प्रमाण कमी करून जैविक खतांचा वापर आल्याच्या पिकासाठी केला आहे. दशपर्णी अर्क,
जीवामृत, पांढऱ्या मुळ्या वाढवण्यासाठी भाताचा वापर केला आहे. त्यामुळे रासायनिक
खते फवारण्यावरील खर्च कमी झाला आहे. 16 ते 17 टन उत्पन्न मिळेल, अशी मला अपेक्षा
आहे.
लॉकडाऊनमध्ये स्वस्थ
न बसता स्वत:च्या उत्पन्नाबरोबच रोजगार निर्मितीचाही प्रयत्न आले उत्पादक
शेतकऱ्यांनी जिल्ह्यात केला आहे.
प्रशांत सातपुते,
जिल्हा माहिती अधिकारी,
कोल्हापूर
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.