ग्रामपंचायती विकास कामांचे मंदिर-पोपटराव पवार
कोल्हापूर दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) :- ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या विचाराने महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत गावातील विकास कामांचे नियोजन करावे.
गावाच्या विकासासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी या योजनेत लोकांचा सहभाग वाढवावा.
मनरेगा योजनेतून जास्तीत जास्त कामे करुन गाव विकास कामात समृद्ध करावे, असे आवाहन
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
मनरेगा योजनेंतर्गत ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’
हा विचार गाव पातळीवर राबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास
अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी
जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपायुक्त नयना बोंदार्डे, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मीता कुलकर्णी, कृषी
विभागाच्या उपसंचालक भाग्यश्री पवार सहभागी झाले. तर रोहयोची प्रधान सचिव श्री. नंदकुमार, मुख्य
कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आदर्श गाव योजना कार्याध्यक्ष पोपटराव पवार, राज्य
महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्षा राणी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी,
तहसिलदार, गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मनरेगा योजना
गाव पातळीवर यशस्वीपणे राबविण्यात सरपंच व ग्रामसेवकांचा मोठा सहभाग असणार आहे.
यासाठी त्यांनी गावकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहचवावी. वैयक्तिक लाभाच्या योजनांबरोबरच
सामुदायिक लाभाच्या योजना राबविण्यावर भर द्यावा. मनरेगातून करण्यात येणाऱ्या कामाचे नियोजन करुन त्याचा कृती आराखडा तयार
करावा. या योजनेत लोकसहभाग घेऊन गावाच्या विकासासाठी योजना सक्षमपणे राबविण्यात पुढे यावे, असेही
पालकमंत्री म्हणाले.
सरपंचांना मार्गदर्शन करताना पोपटराव पवार
म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. त्यांच्या विचाराने
जिल्हा विकास कामात नेहमीच अग्रेसर राहिला असून जिल्ह्याने नवनवीन संकल्पना
राबविल्या आहेत. ग्रामस्वच्छता अभियानात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यानी
आपले वेगळेपण सिद्ध करुन ग्रामस्वच्छता अभियान एक लोकचळवळ बनवली.
श्री. पवार म्हणाले, ग्रामपंचायती विकास
कामांचे मंदिर असून सरपंच व ग्रामसेवक हे पुजारी आहेत. गावाच्या
विकासासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ हा विचार वृद्धींगत
करण्यासाठी ग्रामपंचायतींचा मोठा वाटा असणार आहे. या योजनेतून गावात करण्यात
येणाऱ्या कामांचे नियोजन सरपंच व ग्रामसेवकांनी करुन त्याचा सर्वसमावेशक असा
आराखडा तयार करावा. मनरेगा अंतर्गत गावांच्या विकासासाठी येणारा निधी हा
ग्रामपंचायतींच्या हक्काचा निधी असल्याने या निधीतून व्यक्तीगत लाभाच्या
योजनांबरोबरच सामुदायिक लाभच्या योजनांची कामे अधिक करण्यावर भर द्यावा. सरपंच,
ग्रामसेवक आणि ग्राम रोजगार सेवक यांनी मजुरांचे नियोजनही करावे. मनरेगामधून
होणारी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील यासाठी सरपंचानी काम करणे आवश्यक आहे. आलेल्या निधीतून गावात
गुणवत्तापूर्ण कामे झाल्यास गावाचा कायापालट होईल आणि गाव ग्रामविकासात अग्रेसर
दिसेल.
श्री. पवार म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण हमी योजनेतून वनसंवर्धन, मृदा संवर्धन, जलसंवर्धन आणि पशुसंवर्धन या
योजनांची कामे घेण्यावर भर द्यावा. कोल्हापूर जिल्हा हा पाण्याच्या बाबतीत समृद्ध
जिल्हा आहे. मात्र पाण्याचा वापर अमर्याद झाल्याने जमिनी खराब होऊ लागल्या आहेत. यासाठी मनरेगातून जमिनीचा आरोग्य सुधारणा
कार्यक्रम घेण्यात ग्रामपंचायतीनी पुढाकार घ्यावा. गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे
माती परीक्षण करण्याबरोच पिकांचे नियोजनही करणे गरजेचे आहे.
श्री. नंदकुमार म्हणाले, गावात मनरेगा योजनेतून
भरीव कामे घेऊन गावांचा विकास साधावा. योजनेतून जास्तीत जास्त सामुदायिक लाभाची
कामे घेण्यावर ग्रामपंचायतींनी भर द्यावा. शाळा व अंगणवाड्या समृद्ध करण्यावर भर
द्यावा. योजनेत निवडलेल्या गावात सुबत्ता आणण्यासाठी सर्वच
घटकांनी आपले योगदान द्यावे. तसेच विकेल ते पिकेल या विचाराने शेतकऱ्यांनी शेती
करुन आपला व गावाचा विकास साधण्यासाठी पुढे यावे.
श्रीमती राणी पाटील म्हणाल्या, ‘मी समृद्ध तर
गाव समृद्ध’ हा विचार गावात रुजवून गावाचा विकास साधण्यासाठी पुढे यावे. मनरेगा योजनेची अधिकची कामे घेऊन गावाचे ऋणातून उतराई होता येईल या विचाराने सरपंच, ग्रामसेवकांनी विकास
कामांची आखणी करावी.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल
म्हणाले, समृद्ध गाव, सुंदर गाव, स्वच्छ गाव ही संकल्पना घेऊन मनरेगाच्या कामाचे
नियोजन करावे. कामांची निवड करुन ग्रामसभेची त्याला मान्यता
घ्यावी. शेवटी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती
कुलकर्णी यांनी अभार मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.