कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा
माहिती कार्यालय) : रब्बी हंगाम
2020-21 वर्षासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक विमा योजना लागू करण्यात आली
आहे. रब्बी हंगामातील गहू (बागायत), ज्वारी (जिरायत), हरभरा व उन्हाळी
हंगामातील उन्हाळी भुईमुग ही पिके विमा योजनेंतर्गत घेण्यात आली आहेत. या योजनेचा
लाभ जिल्ह्यातील जास्तीत-जास्त
शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी
केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, रोग व
किडीमुळे, पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या
नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील
जोखीमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि
कृषी क्षेत्राचा गतीमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत ही
या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.
कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित पिकाकरिता
व अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी
ही योजना ऐच्छिक आहे. कुळासह कोणतेही शेतकरी सहभागी होवू शकतात. वास्तवदर्शी विमा
आकारणी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी
हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा आहे. सर्व पिकासाठी जोखीमस्तर
70 टक्के आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7
वर्षाचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली 2 वर्षे वगळून) गुणिले त्या
पिकांचा जोखीमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल, ही या योजनेची वैशिष्ट्ये
आहेत.
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत
नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील
खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट. हवामान घटकाच्या
प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागणी/ लावणी न झाल्यामुळे होणारे
नुकसान. पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे
नुकसान. काढणी पश्चात नुकसान. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या
जोखमीच्या बाबी आहेत.
शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी व बिगर
कर्जदार शेतकऱ्यांनी स्वत: त्यांचे विमा प्रस्ताव ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर,
गहू व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर पूर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. (उन्हाळी
भुईमुगासाठी दि. 30 मार्च 2021)
विमा कंपनीची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून
3 वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी
लिमिटेड, मुंबई या कंपनीची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रार
निवारणासाठी कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18001024088 असा आहे.
गहू (बागायती) साठी जोखीमस्तर 70 टक्के,
विमा संरक्षित रक्कम 38 हजार रू., विमा हप्ता दर 1.50 टक्के व विमा हप्ता दर 570
रू. हेक्टर याप्रमाणे राहील. ज्वारी (जिरायती) साठी जोखीमस्तर 70 टक्के, विमा
संरक्षित रक्कम 28 हजार रू., विमा हप्ता दर 1.50 टक्के व विमा हप्ता दर 420 रू.
हेक्टर याप्रमाणे राहील. हरभरासाठी
जोखीमस्तर 70 टक्के, विमा संरक्षित रक्कम 35 हजार रू., विमा हप्ता दर 1.50 टक्के व
विमा हप्ता दर 525 रू. हेक्टर याप्रमाणे राहील. उ. भुईमुग साठी जोखीमस्तर 70
टक्के, विमा संरक्षित रक्कम 30 हजार 500 रू., विमा हप्ता दर 1.50 टक्के व विमा
हप्ता दर 457.50 रू. हेक्टर याप्रमाणे राहील.
रब्बी हंगामाकरिता योजनेत सहभागी
होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर, गहू
व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर व 30 मार्च 2021 पर्यंत बँकांकडे विमा प्रस्ताव सादर
करावेत.
रब्बी हंगाम 2020 पीक विम्यासाठी रब्बी
ज्वारी- शिरोळ तालुक्यातील फक्त शिरोळ व नृसिंहवाडी (2 महसूल मंडळ), गहू (बा)
हातकणंगले ( 8 पैकी 7 मंडळ (इचलकरंजी वगळून), शिरोळ (7/7 मंडळ), करवीर (11 पैकी 10
मंडळ करवीर वगळून), गडहिंग्लज (7/7 मंडळ) एकूण 31 महसुल मंडळ. हरभरा- हातकणंगले
करवीर, कागल, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा (एकूण 9 तालुके).
उन्हाळी भुईमुग पन्हाळा, गगनबावडा, करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड (6 तालुके) ही पीकनिहाय
अधिसुचित मंडळे / तालुके आहेत.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका
कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यक, सर्व सुविधा
केंद्र (सी.एस.सी. केंद्र) किंवा संबंधित राष्ट्रीयकृत बँक, वित्तीय संस्थेशी
संपर्क साधावा, असेही श्री. वाकुरे यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.