कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती
कार्यालय) : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान व काढणीपश्चात
नुकसानीस प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण देण्यात आले असून जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरमध्ये
पाऊस झाल्याने पिकांचे काढणीनंतर नुकसान होण्याची शक्यता आहे. हंगाम कालावधीत अधिसुचित क्षेत्रातील शेतात पीक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या
अधिसुचित पिकांसाठीच कापणी पासून जास्तीत जास्त 2 आठवड्यांपर्यंत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी
पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची
तरतूद आहे.
अधिसुचित विमा क्षेत्रात अधिसुचित पीक
घेणाऱ्या व पूर्वसुचना दिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही तरतुद वैयक्तिक स्तरावर लागू
राहील. जास्तीत-जास्त दायित्व हे अधिसुचित पिकाच्या बाधित क्षेत्राच्या विमा
संरक्षित रक्कमेएवढे राहील. या बाबींअंतर्गत जोखिमीचा धोका घडेपर्यंत पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या
निविष्ठा खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई विमा संरक्षित रकमेच्या अधिन राहील, असे
काढणी पश्चात नुकसान जोखीम अंतर्गत नुकसान भरपाईचे निकष राहतील.
शेतकऱ्यांनी
घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबाबतची पूर्वसुचना क्रॉप इन्शुरन्स ॲप अथवा टोल
फ्री क्रमांकाव्दारे विमा कंपनीस, संबंधित बँक व कृषि विभागास देण्यात यावी.
सर्वप्रथम प्राधान्याने क्रॉप इन्शुरन्स ॲपव्दारे पुर्वसूचना देण्यात यावी. मोबाईल
ॲपव्दारे शक्य न झाल्यास संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकवर सूचना देण्यात
यावी अथवा या आपत्तीची माहिती बँक/ कृषि विभाग यांना द्यावी. तसेच ही माहिती
संबंधित बँक/ विभागाकडून संबंधित विमा कंपनीस तात्काळ पुढील 48 तासात पाठवण्यात
येईल. इतर नोंदणी स्त्रोतांकडून प्राप्त पूर्वसुचनांची नोंद संबंधित कार्यालयाने
वा विमा कंपनीने राष्ट्रीय पिक विमा पोर्टलवर करावी.
नुकसान
भरपाई निश्चित करणेसाठी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे :-
नुकसान भरपाईबाबत पूर्वसुचना मोबाईल ॲपव्दारे
कळविली नसल्यास शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील
अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह (शेतकऱ्याचे नाव, बाधित सर्व्हे नं. व पिकनिहाय
बाधित क्षेत्र, पोर्टलवरील शेतकरी अर्ज क्रमांक, मोबाईल नं., KCC A/c No.
शेतकऱ्यांसाठी), बचत खाते नं. (बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी), विमा हप्ता भरल्याचा
पुरावा इ. विमा कंपनीस विहित कालावधीत सादर करणे आवश्यक. शेतकरी परिपूर्ण माहितीसह
विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू
शकतो. परंतु, अर्जातील उर्वरित माहिती 7 दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे
आवश्यक. पीक नुकसानीचा पुरावा म्हणून क्रॉप इन्शुरन्स ॲप या मोबाईल ॲपव्दारे नुकसानग्रस्त
क्षेत्राचे छायाचित्रे विमा कंपनीस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली
आहे.
पीक
नुकसानीची पुर्वसूचना देण्यासाठीचे क्रॉप इन्शुरन्स ॲप हे मोबाईल ॲप गुगल प्ले
स्टोअरवरून डाऊनलोड करावे. पीक नुकसानीचे सर्वेक्षण संयुक्त समितीमार्फत करण्यात
येईल ज्यात विमा कंपनीचा पर्यवेक्षक, शासन प्रतीनिधी आणि संबंधित शेतकरी यांचा
समावेश राहील. संयुक्त समितीने विहीत प्रमाणात केलेल्या नमुना सर्वेक्षणाच्या
आधारे विमा कंपनीमार्फत नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येईल. काढणी पश्चात जोखमीकरिता
जर बाधित क्षेत्र हे अधिसुचित विमा क्षेत्राच्या 25 टक्के पर्यंत असेल तर वैयक्तिक
स्तरावर व 25 टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी
(विमा योजनेत सहभागी झालेले व पिकाचे नुकसान विहित वेळेत पुर्वसूचना दिलेले)
नुकसान भरपाईस पात्र राहतील.
खरीप हंगाम 2020
मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी रिलायंन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि
ची नियुक्ती करण्यात आली असून टोल फ्री क्रमांक 18001024088 आहे.
काढणी पश्चात जोखीम अंतर्गत उपरोक्त प्रमाणे
कार्यवाही करणेबाबत जिल्हा प्रशासन व सर्व संबंधित विमा कंपनींना सुचना देण्यात आल्या असून विमा कंपनीमार्फत
सर्वेक्षणासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.