मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

जिल्ह्यात कोटपा कायद्याची कडक अंमलबजावणी करा -जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके शाळांच्या 100 यार्ड परिघात तंबाखू विक्रीस बंदी







                कोल्हापूर, दि. 11 (जि.मा.का.) : तंबाखूमुक्त जिल्हा बनविण्याचा प्रशासनाचा संकल्प असून जिल्ह्यात कोटपा कायद्याची कडक अंमलबजावणी करा, अशी सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी येथे बोलताना केली.
       तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार कलम 5 च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत श्री. कवितके बोलत होते. बैठकीस अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, जिल्हा जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख देसाई,  राष्ट्रीय तंबाखू मुक्त कार्यक्रमाच्या समुपदेशक चारुशिला कनसे, समितीचे सदस्य डॉ. पी.एम. चौगुले, डॉ. जगन कराडे, प्राचार्य लोखंडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.     
          कोटपा कायद्यांतर्गत गेल्या वर्षभरात म्हणजे 2018-19 मध्ये विविध कलमांतर्गत कारवाई करून एकूण 57 व्यक्तींवर कारवाई करून 89 हजाराहून अधिक रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावर्षी एप्रिल पासून कोटपा कायद्यांतर्गत 63 व्यक्तींविरूध्द कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 12 हजार 300 रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचेही श्री. केंबळकर यांनी सांगितले.
          तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीव्दारे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प असून दुसऱ्या टप्यात माध्यमिक तसेच अन्य खाजगी शाळा तंबाखू मुक्त करण्याचे प्रयत्न आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 1 हजाराच्या आसपास शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा लवकरच तंबाखू मुक्त होतील, असा विश्वास श्री. कवितके यांनी व्यक्त केला. तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने निश्चित केलेल्या 11 निकषांची जिल्ह्यातील सर्व शाळांनी  काटेकोरपणे करुन आपली शाळा तंबाखूमुक्त शाळा बनवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. तंबाखूमुक्त शाळांसाठीच्या निकषांमध्ये शाळांच्या परिसरात तंबाखूच्या वापरास प्रतिबंध, तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना, धुम्रपान आणि तंबाखूचा वापर करणे हा एक गुन्हा आहे असे फलक लावणे, शाळांमध्ये तंबाखूचे दुषपरिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याची पोस्टर्स लावणे, तंबाखू विरोधी संदेश शालेय साहित्यावर चिटकवणे, कोटपा कायद्याची प्रत शाळेत ठेवणे, शासन नियुक्त नोडल अधिकारी  व आरोग्य अधिकारी यांच्या सल्ल्याने कामकाज करणे, शाळेच्या नियमित आरोग्य उपक्रमामध्ये तंबाखू नियंत्रणचा समावेश करणे, शाळेपासून 100 यार्ड क्षेत्रात तंबाखू उत्पादनाच्या विक्रीवर पूर्ण बंदी असल्याचे फलक लावणे. तंबाखू नियंत्रण उपक्रमात काम करणाऱ्यांचा गौरव करणे आणि आमची शाळा तंबाखू मुक्त शाळा असा फलक लावणे, या बाबींचा समावेश असल्याचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी सांगितले.

शाळांच्या 100 यार्ड परिघात तंबाखू विक्रीस बंदी
           शाळा, महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये 100 यार्ड परिघात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्यान्वये बंदी असून या  कायद्याचे  उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द कडक कारवाई करा असे निर्देशही श्री. कवितके यांनी दिले. शिक्षण संस्था प्रमुख तसेच मुख्याध्यापकांनी तंबाखू नियंत्रण कायद्यांची कडक अंमलबजावणी करुन शैक्षणिक संस्था, शाळांचा परिसर तंबाखुमुक्त ठेवावा. शाळा तसेच महाविद्यालय परिसरात तंबाखु नियंत्रणासाठी विशेष जनजागृतीपर फलक लावावेत. याकामी मुख्याध्यापक,प्राचार्य तसेच संस्थाचालकांनी सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अन्न व औषधकडून यंदा गुटखा जप्तीची 45 प्रकरणे
          जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने यावर्षी गुटख्याबाबत कडक कारवाई केली असून यावर्षी गुटखा जप्तीची 45 प्रकरणे करून 44 लाखाहून अधिक किंमतीचा 8 हजार 318 किलो साठा जप्त केला असल्याचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच इतर अन्न पदार्थाच्या 12 धाडीमध्ये सुमारे 50 लाख किंमतीचा 38 हजार 402 किलो अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे. गेल्या वर्षभरात म्हणजे 2018-19 मध्ये गुटख्याच्या 67 जप्ती प्रकरणे करून जवळपास दीड कोटीहून अधिक किंमतीचा 11 हजार 663 किलो गुटखा साठा जप्त करण्यात आला असून तो नष्टही करण्यात आल्याचे श्री. केंबळकर म्हणाले.
          अन्न व औषध प्रशासनाने पोलीस व आरोग्य विभागाच्या सहकार्याने धाडी टाकण्याची विशेष मोहिम हाती घेण्याची सूचना श्री. कवितके यांनी केली. ते म्हणाले, शहर व जिल्ह्यातील मॉल्समध्येही अन्न व औषध प्रशासनच्या अन्य कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते किंवा नाही याची पाहणी करावी. तसेच बेकरीबाबतही यासर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, अशी सूचना श्री. कवितके यांनी केली.
          प्रारंभी सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी स्वागत केले व बैठकीसमोरील विषय विषद केले.
 0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.