कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.)
: पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत आज झालेल्या
लोकशाही दिनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 900 निवेदने दाखल झाली. संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्न सोडवावेत. होणार नसतील तरीही तसे त्यांना
पत्राव्दारे कळवावे, असे निर्देश पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिले.
नागरिकांना 'हे माझे सरकार आहे,'असे वाटले पाहिजे. हेलपाटे मारायला लागू नयेत अशा
पध्दतीने अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे करावीत, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन
मुश्रीफ यांनी आज दिल्या.
शासकीय
विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात तीनही मंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून
लोकशाही दिनाची सुरूवात करण्यात आली. यानंतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या
समस्यांबाबत निवेदने स्वीकारण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील,
आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव,
आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ
कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने उपस्थित होते.
अगदी सकाळपासूनच
जिल्ह्यातील विविध भागातील आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अप्पर पोलीस
अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी शिस्तबध्द नियोजन केले होते. आजच्या
निवेदनामध्ये वैयक्तिक तक्रारींपासून विविध विभागांच्या संदर्भात सार्वजनिक
समस्यांबाबतचा समावेश होता. पालकमंत्री श्री. पाटील, ग्रामविकास मंत्री श्री.
मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. यड्रावकर हे तक्रारीच्या अनुषंगाने
उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत
सूचना करत होते.
पाणंद रस्ता खुला
करणे, रस्त्यांची दुरूस्ती, मायक्रो फायनान्सचा प्रश्न, शिक्षण विभागाशी संबंधित,
महापालिका, जिल्हा परिषद, कृषी, एसटी, महसूल, आरोग्य, इचलकरंजी नगरपरिषद अशा विविध
विभागांशी संबंधित समस्या मांडल्या जात होत्या. अंध तसेच दिव्यांग अर्जदारही
आपल्या समस्या मांडत होते.
नागरिकांना हेलपाटे मारायला
लागू नयेत-ग्रामविकासमंत्री
विविध प्रश्नांसाठी
नागरिक शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारत असतात. या नागरिकांची कामे होत असतील
तर ती तात्काळ करा. होणार नसतील तर त्याबाबत पत्र पाठवून त्यांना कळवा. परंतु,
त्यांना हेलपाटे मारायला लावू नका. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला हे माझे सरकार
आहे, असे वाटले पाहिजे. अशा पध्दतीने अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या.
महिनाभरात नाईट लॅंडींग-
पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील
साडेनऊ लाख रूपयाचा
निधी नाईट लँडींगच्या कामासाठी दिला आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही
पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिली. शेती पंपाला वीज जोडणी
देण्याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे. आज दाखल झालेल्या निवेदनाविषयीचे लघू
संदेश त्यांच्या मोबाईलवर पाठवण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
वैद्यकीय बिलांची तात्काळ पूर्तता करा-सार्वजनिक आरोग्य
राज्यमंत्री
पांडूरंग तुकाराम पाटील यांनी आपल्या प्रलंबित
वैद्यकीय बिलासाठी पालकमंत्री श्री. पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री
श्री. यड्रावकर यांच्याकडे निवेदन देवून 3 हजार बिले मंजुरीच्या प्रतिक्षेत
असल्याचे सांगितले. यावर सार्वजनिक अरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांना बोलावून घेवून प्रलंबित
बिलांची तात्काळ पूर्तता करण्याबाबत समज दिली. तर पालकमंत्री श्री. पाटील यांनी का
प्रलंबित आहेत याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्याविषयी निर्देश दिले.
|
आजच्या या लोकशाही दिनाला संबंधित विभाग प्रमुख उपस्थित
होते.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.