गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०




खासगी जागेवरील पे-अँड पार्क बाबत धोरण ठरवा
      - पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : शहरातील खासगी जागांवर पे-अँड पार्क करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने धोरण ठरवावे, अशी सूचना पालकमंत्री बंटी ऊर्फ सतेज पाटील यांनी आज दिली.
             शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज शहर वाहतूक नियंत्रणाबाबत बैठक झाली. या बैठकीला महापौर निलोफर आजरेकर, उप महापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.
            शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील मनुष्यबळ, साधन सामग्री, शहरातील पार्किंग व्यवस्था, उपाय योजना याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी संगणकीय सादरीकरण केले. पालकमंत्री श्री. पाटील योवळी म्हणाले, वाहतूक नियंत्रण शाखेच्या मदतीला  ट्रॅफिक वार्डन नेमावेत. त्यांचे मानधन महापालिकेने द्यावे. 1 मार्च पासून याची कार्यवाही व्हावी. वाहतूक शाखेकडून जमा होणाऱ्या तडजोड शुल्कातील विशिष्ट रक्कम महापालिकेला मिळण्यासाठी तसा प्रस्ताव महापालिकेने तयार करावा. शहरातील बंद असणाऱ्या सिग्नलचा आढावा घेवून गरज असेल तेथे पुन्हा सुरु करावेत.
            गाडी अड्डा स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य द्यावे. रोडवर 10, 20 वर्षांपासून बंद स्वरुपात असणारी वाहने महापालिकेने हटवावी, असे सांगून पालकमंत्री पुढे, जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जाईल. त्या निधीतून महापालिकेने रस्त्यांच्या साईड पट्यांची कामे करावीत. रस्त्यांवरील गती रोधकांवर उत्तम प्रतीच्या पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत. काही ठिकाणी स्काय वॉक तयार करता येतील का याबाबतही विचार व्हावा. एमआयडीसी मधील कारखान्यांमधून कर्मचाऱ्यांच्या वेळांमध्ये 10, 15 मिनिटांचा फरक ठेवण्याबाबत शहर वाहतूक शाखेने पत्र पाठवावे जेणेकरुन वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. महापालिकेने नगररचना विभागाशी चर्चा करुन शहरातील जागांवर पे-अँड पार्क वाढवावेत. त्याचबरोबरच खासगी जागेंवर पे-अँड पार्क सुविधा देण्याबाबत धोरण ठरवावे,  असेही ते म्हणाले.
 0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.