सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

कर्जमुक्ती योजनेंतर्गत आसुर्ले येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ जिल्ह्यातील 50 हजार 618 शेतकऱ्यांच्या याद्या 28 पर्यंत उपलब्ध होतील -जिल्हाधिकारी दौलत देसाई








आसुर्ले व हेर्ले येथे आधार प्रमाणिकरणाच्या पथदर्शी योजनेचा शुभारंभ
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील आसुर्ले येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 50 हजार 618 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यतील पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले आणि हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करून करण्यात आला. आसुर्ले येथील भैरव विकास सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रातांधिकारी अमित माळी, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, तहसिलदार रमेश शेंडगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.बी. माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यात आसुर्ले आणि हेर्ले येथील आधार प्रमाणिकरणाचे कामाचा पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. आसुर्ले येथील 116 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाच्या कामाची पाहणी केली तसेच आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोच पावत्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील 50 हजार 618 शेतकऱ्यांच्या याद्या 28 पर्यंत उपलब्ध होतील - जिल्हाधिकारी
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 50 हजार 618 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 372 कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून 28 तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील.
जिल्हा उपनिंबधक अमर शिंदे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात आज कर्जमुक्ती योजनेतंर्गत आसुर्ले आणि हेर्ले येथे पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा पथदर्शी योजना शासनाने हाती घेतली असून जिल्ह्यातील उर्वरित पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या याद्या 28 पर्यंत उपलब्ध केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असेही ते म्हणाले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनीही या याजेनेबद्दल समाधान व्यक्त करून आसुर्ले गावात या योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरणाचा शुभारंभ केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी कर्जमुक्त होणार -शेतकरी बाबासो जाधव
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे माझे 1 लाख 25 हजार 312 रूपयांचे कर्ज माफ होवून मी कर्जमुक्त होणार असल्याचे समाधान आसुर्ले येथील शेतकरी बाबासो बापू जाधव यांनी आधार प्रमाणीकरणानंतर व्यक्त केले. यंदाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे भैरवनाथ विकास सोसायटीकडील 1 लाख 25 हजार 312 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले असताना शासनाच्या या कर्जमुक्ती योजनेमुळे मी कर्जमुक्त झालो हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वात आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमुक्तीबद्दल शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
आसुर्ले येथील खंडू बंडू पाटील यांनीही आपले 34 हजार 500 रूपयांचे थकीत कर्ज  माफ होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करून शासनाचे आभार मानले तसेच थकीत शेतकरी सभासद रेखा कुंडलिक दुगुले यांचे केदारलिंग विकास सोसायटीकडील 75 हजार रूपयांचे थकीत कर्ज माफ होणार असल्याबद्दल त्यांनीही आनंद व्यक्त करून शासनास धन्यवाद दिले.
आसुर्ले गावचे सरपंच भगवान पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. भैरवनाथ विकास सोसायटीचे चेअरमन संपतराव पाटील यांनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आसुर्ले येथील या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाबाबतची माहिती दिली.
समारंभास सहाय्यक निबंधक शिरीष तळकेरी, उपसरपंच संभाजी पाटील, विकास सोसायटीचे सचिव अशोक जाधव यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.