कोल्हापूर, (जिमाका) दि. 22 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी
छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या
निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण
सोहळा 21 व 22 मार्च रोजी होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा भव्य दिव्य
साजरा करु. यासाठी शासनाकडून निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री सतेज
ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिले.
हातकणंगले
तालुक्यातील माणगाव येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाला पालकमंत्री आणि ग्रामविकास
मंत्री यांनी भेट देवून सोहळ्याच्या नियोजनाबाबत आज बैठक घेतली. या बैठकीला
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार
राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी
सरिता यादव, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, माजी आमदार डॉ. सुजित
मिणचेकर आदी उपस्थित होते.
बैठकीच्या
सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्यास पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
करण्यात आला. पालकमंत्री श्री. पाटील पुढे
म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या सोहळ्याबाबत चर्चा होवून मान्यता
दिली. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठक घेवून, राज्याचा
कार्यक्रम म्हणून या सोहळ्याची सर्व जबाबदारी शासनाने घेतली आहे. भारतरत्न डॉ.
आंबेडकर यांना देशाचे नेते म्हणून राजर्षी
छत्रपती शाहू महाराजांनी या परिषदेच्या माध्यमातून पुढे आणले. त्यांच्या
नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी ही
ऐतिहासिक माणगाव परिषद आहे. याच माणगावमध्ये मागासवर्गीय महिला सरपंचाला पद
देवून देशाला या गावाने पुरोगामी संदेश दिला आहे. या सोहळ्यासाठी 26
फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयात सूचना द्याव्यात,
त्यापैकी शक्य असणाऱ्या सूचनांचा समावेश नियोजनात केला जाईल.
पर्यायी
पाच एकर जागा समाजाला द्यावी-पालकमंत्री
माणगावमधील
मागासवर्गीय समाजाने स्मारकासाठी पाच एकर जागा देवून समाजाने मोठं मन दाखवलं
आहे. त्यांच्या या दातृत्वातून उतराई होवू शकत नाही. जिल्हाधिकारी यांनी या
समाजाला जवळपास पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना पालकमंत्री
श्री. पाटील यांनी यावेळी केली.
|
ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ अध्यक्षीय भाषणात
म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी भारतरत्न डॉ.
आंबेडकर यांच्या सारख्या हिऱ्याला शोधून त्यांच्या परदेशी शिक्षणाला मदत केली.
संपूर्ण देशाचा नेता म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पुढे आणले.
अशा ऐतिहासिक परिषदेचे नियोजन आपणा सर्वांना करावे लागणार आहे. या स्मारकाचा
उल्लेख राज्याच्या अंदाज पत्रकात व्हावा, अशी विनंती वित्तमंत्र्यांना करणार
असल्याचेही ते म्हणाले.
माणगावकरांना
सलाम-ग्रामविकासमंत्री
सगळ्या
गावाने पुढे येवून ज्योती कांबळे या मागासवर्गीय महिलेला सरपंच पद दिलं, आणि
राज्यालाच नव्हे तर देशाला वेगळा संदेश दिला. अशा गावाला मी सलाम करतो, अशा शब्दात
ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी गौरव केला.
|
जिल्हाधिकारी श्री. देसाई, आमदार श्री. आवळे,
खासदार श्री. माने, खासदार श्री. मंडलिक, माजी आमदार डॉ.मिणचेकर, आमदार श्री. आवाडे
यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. झाकीर भालदार यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार
प्रदीप उबाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषद सदस्य
राहूल आवाडे, समाज कल्याण सभापती प्रतीभा सासने, सरपंच ज्योती कांबळे, उप सरपंच
राजगोंडा पाटील, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक संजय पवार, वास्तु रचनाकार अमरजा
निंबाळकर आदीसह ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.