शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

दहावी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्रे मंडळाच्या संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती
     कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.) : मार्चमध्ये होणाऱ्या 10 वी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर आजपासून स्कूल लॉगइनमध्ये डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांनी दिली.
       मार्च 2020 साठी या विभागीय मंडळाच्या कार्य क्षेत्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांनी 10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेण्यात येवू नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून सही करावी. प्रवेश पत्रामध्ये  विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरूस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ इत्यादी संदर्भातील दुरूस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावरून करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे निर्धारीत शुल्कासह त्वरीत सादर करावयाची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देवून विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून त्यावर स्वाक्षरी करावयाची आहे. तरी 20 मार्च 2020 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेसाठी  प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेवून त्याचप्रमाणे उचित कार्यवाही करावी.
000000
    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.