कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : पत्रकारितेच्या बदलत्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाने
आपल्या कार्यपध्दतीत काळानुरूप बदल आणि सुधारणा करून शासनाची प्रतिमा
उंचावण्याबरोबरच पत्रकारितेसाठी माहितीचा खऱ्या अर्थाने स्त्रोत बनण्याचे काम केले
आहे, असे प्रतिपादन दै. लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी आज येथे केले.
जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि निवडणूक कामकाजामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल
श्री. भोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले, त्यावेळी ते बोलत
होते. जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी
प्रशांत सातपुते, निवृत्त माहिती अधिकारी एस.आर.माने, माहिती सहायक एकनाथ पोवार
यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय माहिती वस्तुनिष्ठ आणि जलद गतीने उपलब्ध करून
देण्याचा जिल्हा माहिती कार्यालय हा स्त्रोत असून या विभागाने माहिती जलद गतीने
देण्याबरोबरच माहितीची विश्वासार्हता जपली
आहे. कमी मनुष्यबळाचा चांगला उपयोग करून शासनाची प्रतिमा जनमानसात उंचावण्याचा केलेला प्रयत्न
कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे, असेही श्री. भोसले म्हणाले.
दिवसेंदिवस बदलणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील
उपक्रमांना आणि सुविधांना माहिती विभागाने आपलंसं करून उपलब्ध मनुष्यबळात अविरतपणे
काम करून पत्रकारांना तसेच प्रसार माध्यमांना विस्तृत माहिती देण्यासाठी चालविलेले
प्रयत्न ही बाब अत्यंत महत्वाची आहे. काळानुरूप माहिती विभागात सुधारणा आणि बदल
घडून आले असून अलीकडच्या काळातील समाज माध्यमांचाही पुरेपूर वापर माहिती विभागाने
मोठ्या प्रमाणात करून त्याची व्यापकता जोपासली असल्याचेही ते म्हणाले. आपल्या
कर्मचाऱ्यांच्या कामाचे केलेले कौतुक हा जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य
आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवून माहिती कार्यालयाने खऱ्या अर्थाने उत्तम
जनसंपर्क सांभाळण्याचे कामही सुरु ठेवले असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी
स्वागत केले व प्रस्ताविकात कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. श्री. एस.आर. माने यांनी
उपक्रमाबद्दल प्रशंसा केली. माहिती सहायक श्री. पोवार यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.