ताराराणी
महोत्सवा निमित्त बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन
कोल्हापूर, (जिमाका) दि. 22 : महिला बचत गटांची चळवळ
अधिक सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या उत्पादनांना बाजार पेठा मिळवून देण्यात शासन
पुढाकार घेईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना
दिली.
महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या
जिल्हास्तरीय ताराराणी महोत्सवाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या
हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला. यानिमित्त महिला स्वयंसहायत्ता बचत गटांनी
उत्पादित केलेल्या वस्तुंचे विक्री प्रदर्शन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार
वितरण सोहळाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते संपन्न झाला. त्या
निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथील आयर्विन ख्रिश्चन हायस्कुलच्या
ग्राऊंडवर तीन दिवसांसाठी आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सव 2020 च्या उद्घाटन
सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम सभापती
हंबीरराव पाटील, महिला व बाल कल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, महाराष्ट्र राज्य
जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी
अधिकारी अमन मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी,
सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार व्यक्त करुन ग्रामविकास मंत्री हसन
मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात बचत गटाची व्यापक चळवळ निर्माण झाली असून या चळवळीला गती देण्याची शासनाची भुमिका आहे.
बचत गटाच्या महिलांना व्यवसाय, उद्योग
उभारणीसाठी सर्व ते सहकार्य केले जाईल. बचत गटाच्या महिलांनी उत्पादीत केलेल्या
उत्पादनांना सुत्रबध्द आणि नियोजनबध्द बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाईल, असेही ते
म्हणाले.
महिला बचत गटांनी यापुढील काळात काळाची गरज ओळखून सेंद्रीय
उत्पादने, कुक्कुट पालना सारखे उद्योग उभे करुन स्वावलंबी बनावे. चुल आणि मुलं या
संकल्पनेतून आता महिला बाहेर पडल्या असून त्या स्वावलंबी आणि सक्षम बनू लागल्या
आहेत. बचत गटांना सर्वते सहकार्य करुन बचत गटांची चळवळ अधिक गतीमान करण्याचा
मानसही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील
म्हणाले, जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे मोठे काम होत आहे.
कितेक महिलांच्या हाताला बचत गटाच्या चळवळीमुळे काम मिळाले आहे. ही चळवळ या पुढील
काळात अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासन आणि शासन निश्चिपणे
प्रयत्नशिल राहील.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, महाराष्ट्र
राज्य जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनीही आपले
मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी स्वागत करुन ताराराणी
महोत्सवाच्या आयोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, या महोत्सवात 104 स्टॉलची उभारणी
केली असून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, जळगाव, रत्नागिरी आदी
जिल्ह्यातील समुह सहभागी झाले आहेत. यामध्ये 114 वस्तुंचे, 47 खाद्यांचे असे 161
समुह सहभागी झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर चप्पल, गुळ, काकवी, कोल्हापुरी साज,
व्हाईट मेटल ज्वेलरी, कापडी पिशव्या, बेदाणे, हाळद, कंदी पेढे, सॉफ्ट टॉईज, मातीची
भांडी, नॅपकीन, घोंगडी तसेच विविध प्रकारची लोणची-पापड, लाकडी खेळणी इत्यादी विविध
वस्तुंची विक्री तसेच शाकाहारी, मांसाहारी जेवण, कोल्हापुरी मिसळ, नाशिकचे
प्रसिध्द मांडे (पुरणपोळी) इत्यादी खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येणार आहे. ताराराणी महोत्सवा निमित्त दि. 22 ते 26 फेब्रुवारी 2020 पर्यंत सायंकाळी 6.30 ते रात्रौ 9.30
वाजेपर्यंत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेने या ताराराणी महोत्सव 2020 या
कार्यक्रमास भेट द्यावी असे आवाहनही श्री. माने यांनी केले.
उपाध्यक्ष सतीश पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त
केले. पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. याप्रसंगी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे
वितरणही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्यांचे सभापती,
जिल्हा परिषद सदस्य, सदस्या, अधिकारी आणि बचतगटांच्या महिला मोठ्यासंख्येने
उपस्थित होत्या.
ताराराणी महोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे
प्रकाशनही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.