शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

रुग्णसेवेच्या बळकटीकरणास प्राधान्य -आरोग्य सभापती हंबीरराव पाटील




            कोल्हापूर दि. 14 (जि.मा.का.): जिल्हयातील रुग्णांना उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यास आरोग्य विभागाचा भर असून रुग्णसेवेच्या बळकटीकरणास प्रशासनाचे प्राधान्य राहील, अशी ग्वाही आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी दिली.
जिल्हयातील आरोग्य विभागाची बैठक आज सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधिष्ठता डॉ.मिताक्षी गजभिये,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, डॉ.अजित लोकरे, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने, प्राध्यापक डॉ.वसंतराव देशमुख, प्राध्यापक डॉ.शिरीष शानभाग, प्राध्यापक डॉ. उल्हास मिसाळ, प्राध्यापक डॉ.अतुल राऊत यांच्यासह इतर आरोग्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 
            जनतेमध्ये जिल्हा रुग्णालयाची विश्वासहर्ता अधिकाधिक वृध्दींगत व्हावी, यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, अशी सूचना करुन आरोग्य सभापती हंबीरराव पाटील म्हणाले की, जिल्हयातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोगयसेवा उपलब्ध करुन देण्यास आरोग्य विभागाचे प्राधान्य राहील, तसेच जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिकाधिक नॉर्मल प्रसुती व्हाव्यात यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  
यावेळी सी.पी.आर. हॉस्पिटलमधील विविध अडचणीबाबत सविस्तर चर्चा  करण्यात आली, जिल्हयातील ग्रामीण भागातील मोठया प्रमाणात रुग्ण सीपीआरमध्ये येत असल्याने औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याची सूचना त्यांनी केली. पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करुन देण्याकामी जिल्हा परिषदे मार्फत सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगांव येथे दरमहा 300 बाहयरुग्ण तपासणी होत असून जवळपास 30 नॉर्मल प्रसुती केल्याबद्दल वैद्यकिय अधिकारी डॉ.माळी यांचे त्यांनी कौतुक केले.
            यावेळी आरोग्य सुविधांच्या अनुषंगाने सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
           
000000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.