गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

कोव्हिड-19 साठी प्रयोगशाळा सोमवारपर्यंत सुरु करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई



       कोल्हापूर, दि. 16 (जि.मा.का) :-  येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोव्हिड-19 साठी सोमवार दि. 20 एप्रिलपर्यंत प्रयोगशाळा सुरु करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
        कोव्हिड-19 साठी  खरेदी पक्रिया राबविण्यबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. स्मिता देशपांडे, सहयोगी प्रा. डॉ. विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रवे विभागाचे कार्यासन अधिकारी यांनी काल दि. 15 एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सीपीआरमध्ये कोव्हिड-19 साठी प्रयोगशाळा सुरु करण्यात येत आहे. त्यासाठी खरेदी प्रक्रिया राबवावी. सीपीआरच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुखांनी आजच लागणाऱ्या उपकरणांची यादी निश्चित करावी. निश्चित केलेल्या वैद्यकीय उपकरणांची खरेदी प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. 18 पर्यंत खरेदी प्रक्रिया राबवावी.
            जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवारपर्यंत उपकरणांची वाहतूक व उपकरणे सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुखाच्यावतीने आस्थापित करावीत. निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनी राबविलेल्या खरेदी प्रक्रियेप्रमाणे पुरेसा निधी उपलब्ध करुन द्यावा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुख यांनी आस्थापित झालेल्या प्रयोगशाळेचे काम सुरु करण्यासाठी तज्ञ, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या नेमणुका करुन त्यांना उद्या  प्रशिक्षण द्यावे. त्याचबरोबर   सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुखांनी प्रयोगशाळेबाबतचे दैनंदिन अहवाल सादर करावेत तसेच प्रयोगशाळेसाठी वेळोवेळी लागणारे किट्स व इतर उपकरणे याचा आगाऊ आढावा घेवून पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे.
            जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आस्थापित प्रयोगशाळेसाठी लागणारी उपकरणे व किट्स खरेदी प्रक्रिया राबवून उपलब्ध करुन घ्यावीत. ही प्रयोगशाळा सोमवारपर्यंत सुरु करण्यासाठी सर्वांनी युध्द पातळीवर प्रयत्न करावेत. तातडीच्या अत्यावश्यक बाबी त्या त्या विभागाने विहित मार्गाने प्रथम खरेदी कराव्यात व नंतर समितीच्या मान्यतेस तसेच निधी उपलब्धतेसाठी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी पाठवावे, असेही ते म्हणाले.
0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.