कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का) : कोरोना साथ रोग प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत शिवभोजन केंद्रातून 10 रुपया ऐवजी 5रुपयांमध्ये थाळी उपलब्ध करुन दिली जात आहे. जिल्ह्यातील अडीच हजाराहून अधिकजण याचा दररोज लाभ घेत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
जिल्ह्यात लॉकडाऊन मुळे 22 ते 27 मार्च या कालावधीत शिवभोजन केंद्रे बंद होती. 28 मार्च पासून ही केंद्रे सुरु करण्यात आली असून 30 मार्च पासून शिवभोजन थाळी लाभार्थ्याना 10/- रु ऐवजी 5/- रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिली जात आहे. जिल्ह्यात सद्या 19 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये जिल्हास्तरावर 6 शिवभोजन केंद्रे आणि तालुकास्तरावर आजरा -1, गडहिंग्लज -3, इचलकरंजी -1, कागल- 2, शाहूवाडी- 2, शिरोळ- 4 केंद्रांचा समावेश आहे.
शिवभोजन केंद्रांमधून प्रत्येकी कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त 250 शिवभोजन थाळ्या गरीब व गरजू व्यक्तींना उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वाढीव वेळेमध्ये जिल्ह्यात 2500 ते 2600 गरजूंना अत्यल्प दरात जेवण शासनामार्फत दिले जात आहे. शासनाच्या शिवभोजन केंद्रा मार्फत उपलब्ध होत असलेल्या थाळी मुळे लॉकडाऊन कालावधीत गोरगरीब जनतेची उदरभरणाची सोय होत असल्याने या लाभार्थीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.