गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात कोव्हिड-19 तपासणी लॅब सुरु -पालकमंत्री सतेज पाटील









कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का) : जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शेंडापार्क येथे आज लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत तपासणी होणाऱ्या स्वॅबचे सर्व अहवाल निगेटिव्ह यावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
       शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीव शास्त्र विभागात आज कोव्हिड-19 तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. स्मिता देशपांडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी लॅबची पाहणी करुन सविस्तर माहिती घेतली.       
       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लॅब सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तत्परतेने जिल्ह्यातील लॅबबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आयसीएमआरने आज मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या स्वॅबची तपासणी आता या प्रयोगशाळेत होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून या लॅबसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या लॅबसाठी लागणारे काट्रीजेस जास्तीत जास्त कशा मिळतील त्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.  45 मिनिटांत तब्बल 16 टेस्ट होणार आहेत, असे सांगून पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यासह राज्य शासनाचे त्यांनी मनापासून धन्यवाद मानले.
       * सी.बी.नॅट जीन एक्सपर्ट मशिन फॉर कोव्हिड-19 
       * 13 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांची मशिन खरेदीसाठी अंतिम मंजुरी
       * 15 एप्रिल रोजी कंपनीस रक्कम ट्रान्सफर.
       * 18 एप्रिल मशिन कोल्हापुरात
       * 20 एप्रिल इंस्टॉलेशन आणि तंत्रज्ञांचे प्रशिक्षण पूर्ण
       * 21 एप्रिल रोजी काट्रीजेस प्राप्त.
       * 23 एप्रिल रोजी आयसीएमआरची मंजुरी आणि कार्यान्वित.
       * दर दिवशी 340 तपासणीची क्षमता.  
 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.