इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा कोव्हिड केअर, हेल्थ आणि रूग्णालयाच्या 40 टक्के सुविधा 15 मे पर्यंत करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई





       कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का) : परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये व्यक्ती येण्याची शक्यता आहे. त्यांना गावातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवावे. त्याचबरोबर कोव्हिड केअर, कोविड हेल्थ आणि कोव्हिड रूग्णालय या त्रिस्तरीय यंत्रणेसाठी अंदाजित संसर्गीत रुग्णांच्या संख्येनुसार  15 मे पर्यंत 40 टक्के सुविधा पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा समन्वयक संजय शिंदे, महसूलचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, भू-संपादन अधिकारी हेमंत निकम, प्रांताधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी, विद्यार्थी आणि इतर त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याबाबत राज्य शासनाकडून आजच आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने बाहेरून व्यक्ती येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी किमान 50 लोकांसाठी संस्थात्मक अलगीकरण कक्षाची व्यवस्था ग्रामस्तरावर करण्याचे नियोजन करा. अशा केंद्रांमधील व्यक्तीचा गावातील व्यक्तीशी संपर्क येणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्या. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल, वस्तीवरील घरांमध्ये सोय असेल तर अशा ठिकाणी त्यांना होम क्वारंटाईन करा. मुख्यत्वे गावाच्या गावठाण भागात व्यक्तीची स्वतंत्र राहण्याची सोय नसल्यास अशा व्यक्तींना पहिले 14 दिवस अलगीकरण केंद्रात ठेवावे. जेणेकरुन गावठाणातील नागरिक जर अशा व्यक्तीस विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे, असे निदर्शनास असे तर सुरक्षित राहतील व संसर्ग गावात पसरणार नाही.
          हे नियोजन युध्दपातळीवर सुरू ठेवून गावामार्फत त्यांच्या जेवणाचीही सोय करावी लागेल. अशा सर्व व्यक्तींच्या आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर्स त्यांची यादी तयार करून नियोजन करावे. अशा लोकांमध्ये लक्षण आढळल्यास त्यांचा स्वॅब ग्रामीण आरोग्य केंद्रामधून घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. गावपातळीवरील यंत्रणा तयार असली पाहीजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
          50 वर्षांपुढील नागरिकांचे आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांच्यामार्फत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या व्यक्तींची जिल्हावार, राज्यवार याद्या तयार कराव्यात. जिल्ह्यामध्ये उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे नियम पाळले जातात का याबाबत सुरू असणाऱ्या उद्योगांना भेटी देवून तपासणी करावी. पथकामार्फत त्यांचे त्याबाबत प्रबोधन करावे. कामगारांसाठी मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर अशांबाबत प्रथम प्रबोधनात्मक काम करावे. वारंवार सांगून ऐकत नसतील तर अशा उद्योगांवर कारवाई करावी. गावातून कारखान्यासाठी दुचाकीवरून जाण्यासाठी कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु, नजिकच्या काळात असा निर्णय झाल्यास गावातून जाणारे कामगार पुन्हा गावात येताना सुरक्षितता कशी राखली जाईल याबाबतही नियोजन करावे.
          क्षेत्रीय स्तरावर आणि कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घ्या. त्यांची वैद्यकीय तपासणी करा त्यांना मास्क, सॅनिटायझर दिलय का हे पहा. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहाय्याने त्याचे वाटप करा. पीपीई किट, मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा, असेही ते म्हणाले.
थर्मल स्कॅनरचा वापर करा- अमन मित्तल
          थर्मल स्कॅनरचा वापर करून कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तपमान तपासावे. जादा तपमान असल्यास त्यांना घरी पाठवावे, कार्यालयात प्रवेश देवू नये, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, आवश्यक त्या सेवा सुरू ठेवा. गावातील रस्ते कायमस्वरूपी बंद करू नयेत. मान्सूनपूर्व कामांमध्ये पाणीटंचाईबाबत तसेच एमजीनरेगाची कामे सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावे. उद्योगांना परवानगी मिळाल्याने त्यादृष्टिने गावांमध्ये हालचाली वाढतील, त्याबाबत योग्य नियोजन करावे, असेही ते म्हणाले.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.