इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात कोव्हिड-19 तपासणी दुसरी लॅब सुरु -पालकमंत्री सतेज पाटील




सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांकडूनही लॅबची पाहणी

       कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का) : जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज दुसरी लॅब कार्यान्वित करण्यात आली. जिल्ह्यात सुरु झालेल्या दोन्ही प्रयोगशाळेचा कमीत कमी वापर होवून जिल्हा कोव्हिड-19 मुक्त रहावा, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही लॅबची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
       शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीव शास्त्र विभागात कोव्हिड-19 तपासणी ही दुसरी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील  आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी यावेळी लॅबची पाहणी करुन सविस्तर माहिती घेतली.
                    रुग्णांची चाचणी लवकर व्हावी या उद्देशाने केंद्र शासन आणि राज्य शासनाने आरटी पीसीआर प्रयोगशाळा जिल्ह्यात सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये आज ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाली, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, 23 एप्रिल रोजी सीबीनेट तंत्रज्ञानाची लॅब कार्यान्वित केली आहे. यापूर्वी स्वॅब तपासणी करण्यासाठी पुण्याला पाठवावे लागत होते. त्यानंतर मिरज येथे पाठवावे लागत होते. आपल्या जिल्ह्यामध्येच या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अहवाल लवकर मिळेल आणि क्वान्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती मिळवणं प्रशासनाला सोपे होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रयोगशाळांना निधी देण्यात आला आहे. लॅबच्या माध्यमातून नवीन सुविधा जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे. कोव्हिड-19 मुक्त जिल्हा रहावा ही अपेक्षा आहे, यासाठी प्रशासन सज्ज प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यामध्ये मोठी सोय- राज्यमंत्री श्री. यड्रावकर
          जिल्ह्यामध्ये या दोन्ही लॅब कार्यान्वित झाल्याने मोठी सुविधा निर्माण झाली आहे. यापूर्वी पुणे आणि मिरज याठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे बराचसा वेळ जात होता आता हा वेळ वाचणार आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी सोय झाल्याची प्रतिक्रिया देवून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी लॅबबाबत समाधान व्यक्त केले.  

आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी-पालकमंत्री
       केंद्र आणि राज्य शासनाने राज्यांतर्गत येण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत कक्ष निर्माण केला जाईल. या कक्षामध्ये अशा लोकांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. ते म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयातील या कक्षात नोंदणी केल्याशिवाय तसेच परवानगी असल्याशिवाय आपल्याला आपल्या गावी जाता येणार नाही.
          बाहेरच्या जिल्ह्यामधून आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना सक्तीने 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार थेट आपल्या घरी न जाता सीपीआरमध्ये तपासणी करुन प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करावी. ग्रामीण भागातही अशा बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी संस्थात्मक अलगीकरणाची सोय करण्यात आली आहे, त्याठिकाणी थांबले पाहिजे. किमान त्याची तपासणी झाली पाहिजे. आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे यापुढेही असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
                   
0 0 0  0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.