रविवार, २६ एप्रिल, २०२०

निवारागृहांमध्ये स्थलांतरित कामगारांसाठी समाधानकारक सुविधा






       संचारबंदिच्या काळात विविध जिल्हे तसेच राज्यांमधून आलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी सध्या जिल्ह्यामध्ये 16 निवारागृह निर्माण करण्यात आली आहेत. या निवारागृहांमध्ये प्रशासनामार्फत समाधानकारक सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्याची भावना या कामगारांनी व्यक्त केली आहे.
       कागलमधील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमधील स्थलांतरित कामगारांसाठी निवारागृहाबरोबरच कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश अशा परराज्यातील 135 आणि राज्यातील 25 कामगारांची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी कम्युनिटी किचनमध्ये निवारागृहातील कामगारांबरोबरच अन्य ठिकाणच्या कामगारांसाठी जेवण बनविण्यात येत आहे. जेवण बनवणाऱ्या स्वयंपाकी महिला तसेच इतर कर्मचारी सामाजिक अंतराबरोबरच मास्कचाही वापर करत आहेत.
          शैयबाज शेख – मी कर्नाटकमधून मुंबईला जात होतो. माझे कुटुंब मुंबईमध्ये आहे. मी गेल्या 28  दिवसांपासून  या निवारागृहात आहे. या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अत्यंत चांगल्या आहेत. जेवण, नाश्ता चांगले आहे. जे मागेल ती सुविधा दिली जाते, फळे वगैरे. जेवणाबाबत कोणतीही तक्रार नाही.
          प्रभू राव – मी चेन्नईमधून राजस्थानला जात असताना महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर थांबविण्यात आले. सध्या या शाळेतील निवारागृहामध्ये दोनवेळा जेवण, सकाळी नाश्ता या सुविधेबरोबरच इतरही सुविधा दिल्या जात आहेत.
          शीलाबाई रामू राठोड –मी सरवड्याला कामाला होते. तिथून कर्नाटकमधील माझ्या गावी जात होते. सध्या या शाळेतील निवारागृहात आहे. या निवारागृहात जेवणाची वगैरे सुविधा अत्यंत चांगली पुरविली जाते.
          अनुजा हेरवाडे (शिक्षिका)- या निवारागृहामध्ये असणाऱ्या महिला, दिव्यांग अशा व्यक्तींची व्यवस्था कशा पध्दतीने होते. आरोग्य तपासणी होते की नाही, खाण्यापिण्याची सुविधा वेळच्यावेळी दिली जाते की नाही याबाबत मी रोज येवून पाहणी करते. याबाबत मी समाधानी आहे.
          दिपक घाटे (जिल्हा समाज कल्याण अधिकारी)-  निवारागृहाचे तपासणी अधिकारी म्हणून नोडल अधिकारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी  जिल्हाधिकारी महोदयांनी दिली आहे. आज या निवारागृहाची तपासणी केली. जेवण करताना सर्वांनी मास्क वापरला होता. त्याचबरोबर सामाजिक अंतरही ठेवण्यात आले होते. येथील कामगारांशी चर्चा केल्यानंतर त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत ते समाधानी असल्याचे दिसून आले.
          जिल्हा प्रशासनामार्फत या निवारागृहांमध्ये अत्यंत चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत. त्याबाबत निश्चितच हे सर्व स्थलांतरित कामगार समाधानी आहेत. संचारबंदीत  त्यांना या निवारागृहात रहावे लागत असल्याने, आपल्या कुटुंबाकडे जाण्याची ओढ लागल्याचे दिसून आले.

                                                  -प्रशांत सातपुते
-जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.