सोमवार, १३ एप्रिल, २०२०

कोरोना विरुध्दच्या युद्धातील योध्दे व मदत साहित्य नोंदणीसाठी उतरले https://kolhapuriwarriors.com संकेतस्थळ



कोल्हापूर, दि. 13 (जिमाका)- कोरोना विरुध्दच्या युध्दात नाग‍रिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन व्हावे यासाठी, जिल्हा प्रशासन व कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या संकल्पनेतून तसेच आई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या सहकार्यातून https://kolhapuriwarriors.com हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तसेच बाहेरील इच्छुक डॉक्टर्स, दवाखाने, संस्था तसेच नागरिकांना मदत कार्याकरिता यावर आपली नोंदणी करता येणार आहे.
          जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक  संजय शिंदे, केडीएमजीचे शांताराम सुर्वे, इंद्रजित नागेशकर,रवीकिशोर माने, अभिजित गाताडे आदी उपस्थित होते.
            कोवीड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी  सामना करण्याकरता महाराष्ट्र शासनाने अनेक उपाययोजना कार्यरत केलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत नाग‍रिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन  व्हावे यासाठी https://kolhapuriwarriors.com हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले. वैद्यकीय व्यावसायिक, पॅरामेडीकल, वॉर्डबॉय, परिचारिका, फार्माशिस्ट, आरोग्य सेवक, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय उपकरणे, दवाखान्यात लागणारे इतर साहित्य, विविध प्रकारच्या सेवा, अन्न धान्याची मदत, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा सेवा, लाँड्री, वाहतूक, सांगणक, तांत्रिक सेवा, डाटा एन्ट्री, प्लंबिंग अशा विविध प्रकारच्या रुग्णालयासाठी लागणाऱ्या सेवा व वस्तू वैयक्तिक किंवा संस्थेच्या माध्यमातून ज्यांना द्यायच्या आहेत अशांनी या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.
            जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील व्यक्ती अथवा संस्थांना कोरोना विषाणू विरुध्द लढ्यात भाग घ्यायचा आहे आणि जिल्हा प्रशासनाला मदत करायची आहे. ही मदत वैद्यकीय अगर बिगर वैद्यकीय असेल  अशा व्यक्तींनी यां संकेस्थळावर आपली नोंदणी करावी. या नोंदणीनंतर जिल्हा प्रशासनामार्फत संपर्क साधण्यात येईल.  या युध्दात आपल्या सहकार्याने विजय मिळवू असा विश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केला.
           केडीएमजीने जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून शहरामध्ये अशी सोय उपलब्ध करण्याबाबतची संकल्पना मांडली. त्यालाआई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूरच्या सभासदांनी उत्स्फूर्तपणे पाठींबा दर्शविला. kolhapuriwarriors.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून इच्छुक डॉक्टर्स, दवाखाने,समाजसेवी संस्था,इतर संस्था तसेच नागरिकांना शक्य असल्याप्रमाणे मदत साहित्य किंवा सेवा पुरवण्याची तयारी नेमकी कोणत्या प्रकारे शक्य आहे हे सर्व देता येण्याची सोय केली आहे. या माध्यमातून कोविड-१९ हे पेंडेमिक मध्ये उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयारी चांगली करता येणार आहे.  
          या व्यवस्थेमध्ये जरूर पडल्यास सर्व प्रकारचे आवश्यक असणारे बदल किंवा माहिती संकलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मदत करण्याची जबाबदारी आई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूर या संघटनेने घेतली आहे. सर्व सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेण्याचे  आवाहन जिल्हा प्रशासन, केडीएमजी व आई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूर यांनी केले आहे. 
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.