बुधवार, २९ एप्रिल, २०२०

रामटेकमध्ये अडकलेले शिखरजी यात्रेकरू घरी परतणार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नाला यश




कोल्हापूर दि. 29 (जिमाका):-  सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी गेलेल्या व  लॉकडाऊनमुळे रामटेक येथे अडकलेल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर या  तीन जिल्ह्यातील 51 यात्रेकरुंना त्यांच्या घरी परतण्यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळे यश मिळाले आहे.  
7 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातून सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी निघालले यात्रेकरु करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांचा प्रवास त्यांनी अर्धवट सोडून स्वस्थळी परतत असताना (मध्यप्रदेशमधून खावासा सीमामार्गे) महाराष्ट्रात 25 मार्च 2020 नागपूर जिल्हयातील तीर्थक्षेत्र रामटेक येथे दाखल झाले आणि जिल्हाबंदी असल्यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.
या यात्रेकरुंनी सार्वजनिक  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली, पण जिल्हाबंदी असल्याने त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यांची राहण्याची,जेवणाची,आरोग्याची व्यवस्था करण्याची सूचना राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी नागपूर जिल्हा प्रशासनास दिली. श्री. यड्रावकर स्वतः फोन करुन त्यांची विचारपूस करीत  होते.
         सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंञी अनिल देशमुख, ग्रामविकासमंञी हसन मुश्रीफ यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करुन यात्रेकरुंना स्वगृही परत आणण्यासाठी प्रयत्न केले. या यात्रेकरुना स्वगृही येण्यास आज परवानगी मिळाली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंञी अनिल देशमुख, ग्रामविकासमंञी  हसन मुश्रीफ, मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव किशोरराजे निंबाळकर, नागपूर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.