गुरुवार, १३ मे, २०२१

‘त्याला काय हुतंय...त्यालाच हुतंय’ ‘नॉकआऊट’ होण्यापेक्षा ‘लॉकडाऊन’ व्हा प्रशासनाला सहकार्य करा..!

 


       आयुष्य हे एकदाचं मिळते...माझ्यामुळे माझ्या जवळच्या माणसांना झाला.. ही खंत नेहमी राहील...प्रशासन खूप चांगल्या उपाययोजना करत आहे...प्रशासन आणि डॉक्टर आमच्यासाठी देवदूत ठरले...म्हणून आम्ही कोरोनामुक्त झालो...आयुष्यातून नॉकआऊट होण्यापेक्षा लॉकडाऊन व्हा.. ‘त्याला काय हुतंय..’अशा अविर्भावात वावरणाऱ्या अनेकांना प्रादुर्भाव झाला आहे. प्रशासनाला सहकार्य करा.. किमान आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असा संदेश कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांकडून दिला जात आहे.

कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केलेल्या ठिकाणी संसर्गाची साखळी तुटल्याने बाधीतांची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याची वाढणारी रूग्णसंख्या कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊन हवाच ! यावर काल दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत एकमत झाले आणि शनिवारी मध्यरात्रीपासून 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय ठरला.

कालअखेर जिल्ह्यात 67 हजार 107 रूग्ण उपचार घेवून घरी गेले आहेत. अद्यापही 12 हजार 816 सक्रीय रूग्ण आहेत. आजअखेर 2 हजार 840 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ही रूग्णसंख्या वाढत राहिल्यास उपचारासाठी मनुष्यबळ, औषधे, साधनसामुग्री विशेषत: रेमडीसीवीर, रूग्णालयातील खाटा आणि प्राणवायूचा पुरवठा याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढ वेळीच रोखण्यासाठी संसर्गाची साखळी तोडणे हे सर्वात महत्वाचे आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबरोबर माझे गाव, माझा तालुका, माझा जिल्हा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

गतवर्षी पेक्षा यावर्षी लसीकरण ही जमेची बाजू आहे. कालअखेर जिल्ह्यात एकूण 8 लाख 81 हजार 426 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 1 लाख 93 हजार 707 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 10 लाख 75 हजार 133 जणांचे लसीकरण झाले आहे.


 

सध्या कडक लॉकडाऊन गरजेचाच

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त विध्वंसक ठरत आहे. राज्यात रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच पहिल्या कोरोना लाटेवेळी झालेल्या मृत्यूपेक्षा या लाटेमध्ये मृत्यू जास्त आहेत.  नवीन स्ट्रेनचा धोका वाढत आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चोवीस तासांमधील कोरोना रूग्णाचा दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर, बेड  याबाबत ताण वाढत आहे.  कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. याचाच एक भाग म्हणून कडक लॉकडाउन करणे आवश्यक आहे.

ज्यावेळी नागरिकांना सवलती दिल्या गेल्या  जसे भाजी-विक्रेते, फळविक्रेते, हातगाडीवाले त्यावेळी त्यांच्यामार्फत कोरोनाचे  सुपर स्प्रेडिंग  झाले. हे ज्यावेळी अशा लोकांचे  अँटीजन टेस्ट केली गेली, त्यावेळी बरेचजण कोरोना  पॉजिटिव्ह आले होते.

लॉकडाउन काळामध्ये जास्तीत जास्त तपासण्या करून  स्प्रेडिंग कमी करणे गरजेचे आहे. तरच, लवकरात लवकर कोरोनाला थोपवणे शक्य  होईल. याच कारणामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करणे आवश्यक आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी  डॉ.उषा कुंभार यांनी केले आहे.

पोलिसांकडून 5 हजार वाहने जप्त, 1 कोटीचा दंड

प्रशासन, पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य सेवक जीव धोक्यात घालून नागरिकांसाठीच उत्तम काम करत आहेत. या सर्वांचे आपण ऐकायला हवे. परंतु, अद्यापही अनावश्यक वर्दळ चालू आहे.

कोल्हापूर पोलिसांनी 4 एप्रिल ते 12 मे अखेर 16 हजार 341 जणांवर मास्क कारवाई करत 34 लाख 64 हजार 500 इतका दंड वसूल केला. 5हजार 140 वाहने जप्त केली. 61 हजार 865 मोटार व्हे. केसेस केल्या आहेत. एकूण 1 कोटी 3 लाख 44 हजार 600 रूपये दंड आकारण्यात आला आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यासाठी रेमिडीसीवरचा कोटा दुप्पट करणे, 10 मे.टन प्राणवायूचा पुरवठा, पी.एस.ए.ऑक्सीजन जनरेटर प्रकल्प निर्मितीवर पाठपुरावा करून भर दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 8 दिवस लॉकडाऊनचा निर्णय सर्व लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून घेण्यात आला आहे. व्यापारी, औद्योगिक आस्थापनांनी स्वत:हून समर्थन दिले आहे.

नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करत प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यांनी ती जबाबदारी पार पाडण्यासाठी काही दिवस घरातच लॉकडाऊन व्हायला काय हरकत आहे. आपल्या आणि प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी...!

 

                                                                                - प्रशांत सातपुते

                                                                             जिल्हा माहिती अधिकारी,

                                                                                    कोल्हापूर

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.