बुधवार, २६ मे, २०२१

(सकारात्मक न्यूज) जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचे मृत्यू आणि वस्तुस्थिती

 

वृत्त विशेष क्रमांक :604    (सकारात्मक न्यूज)              दिनांक : 26/05/2021

 

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचे

 मृत्यू आणि वस्तुस्थिती

   कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी सकारात्मक आहे. मात्र नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे इतर राज्यातील शहरांच्या तसेच राज्याच्या इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 42 लाख 45 हजार 215 इतक्या लोकसंख्येपैकी केवळ जिल्ह्यातील 1 लाख 124 कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी 81 हजार 643 रूग्ण बरे झाले असून 25 मे अखेर केवळ 14 हजार 844 इतके सक्रीय रूग्ण आहेत.

पूर्वीच्या तुलनेत यंदा कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आले आहे. ही संख्या वाढवूनही जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आला आहे. 18 टक्क्यांवर पॉझिटीव्हीटी रेट येणे ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात कोविडमुळे 2865 इतके रूग्ण दगावले. मात्र यातील 50 टक्के मृत्यू हे 60 ते 70 वर्षे वयोगटातील होते. या मृत 50 टक्क्यांमधील सुमारे 70 टक्के मृत्यू हे व्याधिग्रस्त रूग्णांचे झाले आहेत. कोविड रूग्ण उशीराने रूग्णालयात दाखल होणे, घरीच उपचार करणे, कोविडबद्दल स्पष्टपणाने न सांगणे, सामाजिक भिती अशी अनेक कारणे या रूग्णांच्या मृत्यूच्या पाठीमागे आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येत लगतच्या जिल्ह्यातील रूग्णांचीही भर पडल्याने ही संख्या वाढली याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वास्तविक जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहे.

पहिल्या लाटेच्या वेळेस जिल्ह्यात 2396 ऑक्सिजन, 350 आयसीयू तर 140 व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होते. मात्र दुसऱ्या लाटेत प्रशासनाने अनुक्रमे 3174 ऑक्सिजन, 648 आयसीयू तर 300 व्हेटींलेटर बेड उपलब्ध केले. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील 17 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 21 ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालये त्याचबरोबर सर्व कोवीड सेंटरवर आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुना तपासणीची सोय केल्याने बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोईचे गेले.सध्या जिल्ह्यात 83 कोवीड काळजी केंद्रे, 93 सपर्पित तर 12 कोवीड समर्पित दवाखाने उपलब्ध आहेत. त्यामुळे रूग्णांवर त्वरीत उपचार होताहेत. पहिल्या लाटेत सर्व साधारणपणे 28 मेट्रीक टन इतका ऑक्सिजन लागत होता. तर यंदा प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त करून जिल्ह्यातील कोविड रूग्णांसाठी सुमारे 52 टन म्हणजे जवळपास दुप्पटीने ऑक्सिजन उपलब्ध केला तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या 14 ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारण्याची तयारी तातडीने सुरू केली आहे.

इतर राज्ये तसेच राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याचा लोकसंख्येच्या प्रमाणात येथील मृत्यूदर कमी होता. तो कधीच जास्त नव्हता. मात्र, कोल्हापूरबाबत काहीसे नकारात्मक चित्र उभे राहिले. की जे चित्र प्रशासनाने आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरवणारे होते.

जिल्ह्यातील 40 लाख लोकसंख्येपैकी सुमारे 9 लाख 13 हजार 650 नागरिकांनी पहिला डोस तर 2 लाख 28 हजार 894 इतक्या लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस (प्रतिबंधक लस) घेतला आहे. म्हणजेच, जिल्ह्यातील 27 ते 28 टक्के नागरिकांनी कोवीड लस घेतली आहे. लसीकरणाबाबत राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. लसीकरणामध्ये राज्यात कोल्हापूरने बाजी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या या प्रयत्नांना कोल्हापूरकरांनी मनापासून साथ द्यावी..इतकच...!

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.