कोल्हापूर,
दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): मागील
वर्षी कोविड -१९ या जागतिक' महामारीच्या लागणीनंतर नियमीत लसीकरणाकरिता बालकांना
घेऊन दवाखाना किंवा लसीकरण केंद्रावर जाण्याविषयी पालकांच्या मनामध्ये भीती
असल्याचे निदर्शनास आले आहे. लसीकरणाविषयीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनानुसार
महामारीच्या कालावधीत देखील नियमीत लसीकरणाची सुविधा शासकीय व महानगरपालिकांच्या
लसीकरण केंद्रावर उपलब्ध आहे, तसेच खाजगी बालरोगतज्ञांच्या दवाखान्यांमध्ये देखील
सदर सुविधा उपलब्ध आहे. लसीकरण केंद्रावर न जाण्यासाठी पालकांच्या मनातील संकोच,
कोविड कालावधीत आरोग्य केंद्रावर जाण्याविषयीची भिती, लॅाकडाऊन, त्यामुळे
प्रवासाच्या अडचणी, कोविडची लाट इत्यादी कारणे असू शकतील.
सद्यस्थितीमध्ये कोविडची दुसरी लाट ओसरत
असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यामधील येणारे आजार तसेच कोविडच्या संभाव्य
तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेतां
ज्या बालंकांचे नियमीत लसीकरण करण्याचे राहून गेले आहे अशा बालकांच्या
पालकांनी शासकिय किंवा खाजगी केंद्रावर
जाऊन बालकांना लस दिली पाहिजे , ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण
प्राप्त होईल. सर्व शासकिय व महानगरपालिका तसेच खाजगी केंद्रावर विविध आजारास
प्रतिबंधक लसींची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना
संरक्षित केले पाहिजे.
आगामी काळामध्ये चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार
व शासनाच्या मान्यतेनंतर ,लसींच्या उपलब्धतेनुसार बालकांचेही लसीकरण करता येऊ
शकेल. तथापी, तोपर्यंतच्या कालावधीत सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचे विविध
संक्रमित आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करून घेणे व कोविड
प्रतिबंधासाठीच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अनाथाश्रम ,
वसतिगृहे, अनुरक्षणगृहे, रिमांड होम व कारागृहामध्ये आईसोबत राहणाऱ्या बालकांची
विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
विविध कारणांमुळे राहिलेला लसीकरणाचा डोस
देण्यासाठी व अधिक माहितीसाठी पालकांनी त्यांच्या कौटुंबिक डॅाक्टरांना,
बालरोगतज्ञाकडे, नजिकच्या शासकिय, महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर संपर्क करावा
व आपल्या पाल्यांना सुरक्षित करावे, असे आवाहन सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे व
कोविडसाठी गठित बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.