इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३१ मे, २०२१

प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 





कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील नागणवाडी, आंबेओहळ सर्फनाला आणि धामणी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही. त्यांना योग्य तो न्याय देण्याचे कार्य जलसंपदा विभागामार्फत करण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील राधानगरी, कागल तसेच आजरा विभागातील लघु-मध्यम प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुर्नवसन अधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, शासकीय यंत्रणेकडून प्रकल्पग्रस्तावर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी त्याचबरोबर त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून शक्य ती सर्व मदत करावी. जिल्ह्यातील या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक 2 महिन्यांच्या आत करण्यात यावी. मात्र हे करत असताना प्रकल्पग्रस्तांनीही यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

प्रकल्पग्रस्तांच्या आर्थिक मोबदल्याचा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर निकाली काढावा. या कामी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष द्यावे, असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी या बैठकीत दिले तर प्रशासनाने जमीनीसह जे-जे अस्तित्वात आहे त्या सर्वांची मोजणी नियमाप्रमाणे करावे आणि त्याचा योग्य तो मोबदला ग्रामस्थांना मिळाला तर ग्रामस्थांचा (प्रकल्पग्रस्तांचा) मोजणीला विरोध नसल्याचे प्रकल्पग्रस्तांनी यावेळी बैठकीत स्पष्ट केले.

प्रकल्पबाधितासंदर्भातील आवश्यक ती मोजणी पावसाळ्यापूर्वी संपविण्यात येईल. त्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात येत्या बुधवारी करण्यात येईल अशी माहिती प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी दिली. यावेळी विजय देवणे, संपत देसाई, संजय तरडेकर, अशोक जाधव, धनाजी गुरव आदी उपस्थित होते.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.