मंगळवार, १८ मे, २०२१

खत बचतीची विशेष मोहीम जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांचे आवाहन


 

कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलीत वापर होण्याच्या उद्देशाने खरीप 2021 मध्ये खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी कळविले आहे.

या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी विशेषत: भात, सोयाबीन, कापूस, ऊस इत्यादी करीता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करुन देणे. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर जमिन सुपिकता निर्देशांक दर्शविणारा फलक प्रदर्शित करणे व त्याचे सामुहीक वाचन करणे, जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करणे, जैविक खतांची बीज प्रक्रीया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाणाचे अनुदानावर विततण करणे याबाबत मोहीम स्वरुपात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  

भात पिकाकरीता युरीया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, कृषी सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रीय कर्बाची वाढ होण्यासाठी उसाची पाचट जागेवर कूजविणे, व्हमींपोस्ट, गांडुळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर वाढवून रासायनिक खतांची मागणी कमी करणे तसेच विविध पिक योजनांतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्याक्षिकांचे आयोजन करणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. वाकुरे यांनी केले आहे. 

000000

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.