आपल्या
खात्यात रक्कम सुरक्षित असल्याने ग्राहकांनी बँकेत, एटीएमवर गर्दी करु नये
कोल्हापूर,
दि. 1 (जि.मा.का):- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यांत
जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारे परत जाणार नाही, उलट ती आपल्या खात्यामध्ये
सुरक्षित राहणार असल्याने ग्राहकांनी बँक तसेच एटीएमवर गरज नसतांना पैसे
काढण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी राहुल माने
यांनी केले आहे.
प्रधानमंत्री
गरीब कल्याण योजनेंतर्गत ज्या महिलांची प्रधनमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकामध्ये बचत
खाती आहेत, अशा खात्यांमध्ये केंद्र सरकार वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसार एप्रिल,
मे आणि जून 2020 या तीन महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला 500 रुपये बँक खात्यात
जमा होणार आहेत, त्यापैकी एप्रिल 2020 च्या रक्कमा महिलांच्या बचत खात्यामध्ये जमा
करण्याची कार्यवाही सुरु आहे, जर रक्कम काढली नाही तर परत जाणार आहे, असा बऱ्याच
महिलांमध्ये गैरसमज होऊन बँक शाखा आवारात पैसे काढण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जमा
होणाऱ्या या रक्कमा कोणत्याही प्रकारे परत जाणार नाहीत, त्याचप्रमाणे या रक्कमा
आपल्या बँकखात्यामध्ये सुरक्षित राहणार आहेत, पैशांची अत्यावश्यक गरज असल्यासच बँक
शाखा, एटीएम तथा बॅक मित्र यांच्याकडे जाऊन या रक्कमा महिला कधीही काढू शकतात,
त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी राहुल माने
यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्हयात एकूण 617 बँक शाखा आणि
658 एटीएम केंद्रे तसेच 280 बँक व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्रे उपलबध आहेत.
महिला, पेन्शनर्स यांनी व इतर शासकीय लाभार्थींच्या रक्कमा त्यांच्या बॅक खात्यात
सुरक्षित असून रक्कमा काढण्यासाठी अनावश्यक होणारी गर्दी टाळावी, शासनाने सुचित
केल्याप्रमाणे सामाजिक अंतर तसेच आपल्या आरोग्याची योग्य सुरक्षा घेऊनच रक्कम
काढण्यासाठी बँक शाखा, एटीएम व व्यवसाय समन्वयक या ठिकाणी भेट द्यावी, कोणत्याही
अफवा तसेच गैरसमजावर विश्वास ठेऊ नये अशी सूचना करुन जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी
राहुल माने म्हणाले की, जिल्हयातील सर्व बँकांना याबाबतीत सूचना देण्यात आल्या
असून सर्व बँक शासनाच्या तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचना पाळून पैशांचे वितरण करीत
आहेत, सर्व शाखा सामाजिक अंतर त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणा बाबतच्या सूचना पाळत
आहेत. ग्राहकांनी या बाबतीत सर्व बँक शाखांना योग्य सहकार्य करुन कोरोना साथीच्या
रोगापासून आपला सर्वतोपरी बचाव करावा, असे आवाहनही श्री. माने यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.