कोल्हापूर,
दि. ८ (जिमाका)- सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही
सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते, वाहने.दवाखाने, कार्यालये, बाजार इ.) तीन
पदरी मास्क किंवा साधा कापड़ी मास्क किंवा रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून
वावरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज
दिले.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा
(कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897
दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागू करुन खंड 2, 3, 4 मधील तरतुदींची अमलबजावणीसाठी
अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली संदर्भिय 3 अन्वये प्रसिध्द
केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले आहे.
कोविड-19
विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा
भाग म्हणून नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सर्व
नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते,
वाहने.दवाखाने, कार्यालये, बाजार इ.) तीन पदरी मास्क किंवा साधा कापड़ी मास्क
किंवा रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक करण्यात येत आहे.
यासाठी
वापरण्यात येणारे मास्क हे प्रमाणित असलेल्या कोणत्याही औषध दुकानात मिळणारे किंवा
घरगती तयार करण्यात आलेले कापडाचे, रुमालाचे धुण्यायोग्य असावेत, तसेच त्याचा
पुनर्वापर करताना स्वच्छ धुवूनन निर्जंतुकिकरण करुन वापरावेत, असे मास्क
प्रत्येकाचे स्वतंत्र असावेत व एकमेकांमध्ये हस्तांतरीत करु नयेत. वापर झालेले असे
सर्व मास्क इतरत्र टाकून न देता जाळून नष्ट करावेत.
कोणत्याही
नागरिकानी किंवा शासकीय / निमशासकीय, खासगी
कर्मचाऱ्यांनी त्याचे स्वत:च्या अथवा कार्यालयाच्या वाहनातून आपल्या
कार्यक्षेत्रात किंवा कार्यालय परिसरात प्रवास करताना, काम करताना, बैठकीचे वेळी
किंवा इतर कोणत्याही कारणासाठी दोन व्यक्तींनी एकत्र येताना सुरक्षित अंतर ठेवणे व
मास्क वापरणे बंधनकारक करण्यात येत आहे.
सर्व
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना, शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर सर्व
विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी वरील
सूचनांच्या बरोबर बैठकीसाठी अथवा इतर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी एकत्र येताना
परस्परात वैद्यकीयदृष्ट्या निर्धारित केलेले सामाजिक अंतराचा (Social Distancing)
निकष पाळणे बंधनकारक आहे.
कोणत्याही
नागरिकांस सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, धापलागणे, थकवा येणे इ. कोरोना सदृष्य
आजाराची लक्षणे दिसत असल्यास त्यांनी त्वरीत सक्तीने वैदयकीय तपासणी करून घेणे व
शासकीय रुग्णालयांच्या सल्ल्याने कोरोना विषाणू संसर्ग तपासणी शासकीय निर्धारित
ठिकाणी करुन घेणे त्याच प्रमाणे लक्षणे दिसू लागताच त्याबाबत आरोग्य/ वैद्यकीय
अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक करण्यात येत आहे.
कोणतीही
व्यक्ती कोरोना विषाणू तपासणीत पॉझीटिव्ह किंवा बाधीत आढळून आल्यास अशा
व्यक्तीच्यापुढील दोन तपासण्या निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत वैदयकीय सल्ल्याने
शासकीय विलगीकरण केंद्रात किंवा आरोग्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्धारित केलेल्या
विलगीकरण किंवा अलगीकरण केंद्रात राहणे बंधनकारक करण्यात येत आहे.
कोणतीही
व्यक्ती कोरोना विषाणू तपासणीत पॉझीटिव्ह किंवा बाधीत आहे असे आढळून आल्यास त्या
व्यक्तीने व त्यांचेशी थेट किंवा इतर
पध्दतीने संबंधीत व संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी त्यांचा मागील एक
महिन्याचा पूर्व इतिहास, भेटी दिलेल्या
ठिकाणांची व संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती, प्रवासाबाबतची माहिती किंवा
आवश्यक सर्व माहिती शासनास देणे बंधनकारक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अशा सर्व
व्यक्तीना वैदयकीय सल्ल्याप्रमाणे निर्धारित कालावधीसाठी विलगीकरण किंवा अलगीकरणात
राहणे बंधनकारक करण्यात येत आहे.
सर्व
नागरिकांनी कोणतेही कामकाज पार पाडताना कोवीड-19 या विषाणू संसर्ग प्रतिबंध
उपाययोजनांची आवश्यक ती काळजी घ्यावी, शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण
विभागाने यासंबंधी वेळोवेळी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही
या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0 0 0 0
0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.