गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील रक्कम लाभार्थींना पोष्टामार्फत घरपोच करण्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश




            कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का.) : जिल्हयातील विविध राष्ट्रीयकृत बँकामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणारी रक्‌कम जिल्हा अग्रणी बँकेच्या पुढाकाराने आणि पोष्टाच्या सहकार्याने इंडीया पोष्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना त्याच्या घरी पोहोच करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज जारी केले आहेत.
            कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हयातील विविध राष्ट्रीयकृत बँकामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थी पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येवून गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व विविध बँकात पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, नुसार  खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
            जिल्हयातील सर्व बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभाथ्यांची गावनिहाय यादी जिल्हा अग्रणी बँकेकड़े त्वरीत सादर करावी. जिल्हा अग्रणी बँकेने सदरची यादी एकत्र करून पोष्ट' ऑफीसकडे जमा करावी, पोष्ट ऑफीसने इंडीया पोष्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जावून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील जमा झालेली रक्कम आदा करावी. याबरोबरच लाभार्थ्यांना रक्कम देण्याची कार्यवाही पोष्ट ऑफीस तसेच नेहमीप्रमाणे बँकाद्वारेही करण्यात येईल.
            राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना  निर्गमित केली आहे.  ही कार्यवाही करीत असताना पारित करण्यात आलेल्या बंदी आदेशाचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी केली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास, संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानन्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.