कोल्हापूर,
दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेल्या
महसूल जत्रेअंतर्गत सामोपचाराने व लोकसहभागातून शेत रस्ते अतिक्रमण मुक्त होत
आहेत. आज एकाच दिवशी भुदरगड तालुक्यातील 53 गावातील 61.980 तर आजरा तालुक्यामधील
52 गावातील 66.700 किमी लांबीचे रस्ते खुले करण्यास सुरूवात झाली.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जेसीबी चालकास स्वतः सूचना देत भुदरगड तालुक्यातील
मौजे पिंपळगाव येथील कामत पाणंद 2.5 किमी रस्ता खुला करण्याचा शुभारंभ आज केला.
भुदरगड तालुक्यातील 3 हजार 344 शेतकऱ्यांना तसेच आजरा तालुक्यातील 2 हजार 715
शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
गाव शिवारातील प्रलंबित आणि जिव्हाळ्यांच्या
प्रश्नांना सामोपचाराने आणि लोक सहभागाने वाट मोकळी करून देण्यासाठी जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी जिल्ह्यात महसूल जत्रेचे आयोजन केले आहे. या महसूल जत्रेअंतर्गत पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त होण्यास सुरुवात
झाली आहे.
भुदरगड तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील कामत
पाणंद रस्ता खुला करताना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जेसीबी चालकास स्वतः सूचना देत याचा
शुभारंभ केला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार अश्विनी वरुटे,
जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आबिटकर, सरपंच विश्वनाथ कुंभार, उपसरपंच उदय मिसाळ, पंचायत समिती माजी सभापती
स्नेहल परीट, मंडळ अधिकारी रामदास लांब, तलाठी दयानंद कांबळे, विलास चव्हाण, सी. एच.
चौगुले, अरुण पाटील, माजी सभापती जगदीश पाटील, ग्रामसेवक बोडके माजी सरपंच
बाळासाहेब खतकर, चंद्रकांत शेवाळे, अशोक पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व कर्मचारी, गावातील सर्व महिला बचत
गटाचे पदाधिकारी व सदस्य सर्व तरुण मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विद्याधर परीट यांनी सर्वांचे स्वागत
केले तसेच सरपंच विश्वनाथ कुंभार यांनी प्रास्तविक केले.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने
पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि
या कामात सहकार्य करावे, असे आवाहन करुन ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल
त्यांचे आभारही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी मानले आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.