‘रेशमाच्या रेघांनी..लाल-काळ्या धाग्यांनी..कर्नाटकी
कशिदा मी काढिला..’ कवियित्री शांता शेळके यांच्या
या प्रसिध्द लावणीमध्ये रेशमाच्या साडीचे वर्णन आहे. याच रेशमाच्या उत्पादनासाठी करवीर
तालुक्यातील बेले गावच्या तेरा शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजनेतून तुती लागवड रेशीम किटक संगोपन गृह उभे केले आहे. यातून लाखो रूपयांचा
नफा मिळवून इतरांना प्रेरणा देणारा नवा प्रयोग केला आहे.
बेले गावचे ग्राम रोजगार सेवक तानाजी पाटील
हे नागपूरला प्रशिक्षणाला गेले होते. मनरेगामधून काय-काय कार्यक्रम हाती घेता येतील
याबाबत याठिकाणी चर्चा झाली होती. 100 टक्के अनुदान असणाऱ्या तुती लागवड किटक संगोपन
गृह प्रकल्प आपल्या गावात राबवायचा मनोदय त्यांनी केला होता. गावात येऊन याबाबत माहिती
देण्यासाठी गाव सभा बोलावण्यासाठी गावात दवंडी दिली.
दवंडी ऐकून अवघे 20-25 ग्रामस्थ जमा झाले.
जिद्द न हारता श्री. पाटील यांनी प्रकल्पाबाबत उपस्थित ग्रामस्थ शेतकऱ्यांना प्रकल्पाविषयी
सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पाला 1 कोटी शासन अनुदान देवू शकेल काय अशी शंका उपस्थित
करून सुरूवातीला ती हास्यास्पद ठरवली. परंतु, गावातीलच 17 जणांनी आज यशस्वी तुती लागवड
किटक संगोपन गृह उभा करून इतरांनाही प्रेरणा दिली.
पारंपरिक ऊस शेती सोडून या नव्या प्रयोगात
गावातील लाभार्थी शेतकरी आज लाखो रूपयांचे उत्पन्न घेत आहेत. याबाबत अत्यंत आनंदाने
आणि उत्साहाने ते समाधान व्यक्त करत आहेत.
सुरेश
पाटील (लाभार्थी):- गावामध्ये पूर्वीपासून ऊस शेती करत होतो. तुती लागवड आणि किटक
संगोपन गृहाची संकल्पना रोजगार सेवक श्री. पाटील यांनी मांडली होती. तुती लागवडबाबतचे फायदे सांगितले. यानंतर
पड असणारी जमीन मशागत करून लागवडी योग्य बनवली. व्ही -1 जातीच्या तुतीच्या कांड्या
यळगुडमधून आणल्या. त्यापासून रोपे करून त्याची लागवड केली. जून 2019 पासून 8 बॅचेस
झाल्या. खर्च वजा जावून सव्वा लाखाचा फायदा मिळाला. शिवाय शासनाकडून सुमारे साडेतीन
लाख रूपये मिळाले. पत्नी, मुलगा यांचीही यासाठी मदत झाली आहे. लॉकडाऊनच्या काळातही
फायदा झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रल्हाद पाटील (लाभार्थी):- गेल्या दीड ते दोन वर्षापासून तुती लागवड
करून प्रशिक्षण घेतले. उसाला फाटा देवून वेगळे काही करायचा विचार होता. तो आता साकार
झाला आहे. आजअखेर 8 ते 10 बॅचेस झाल्या आहेत. कोष चांगल्या प्रकारचे घेतले आहेत त्यामुळे
आर्थिक लाभ चांगला मिळाला आहे. कुटूंबियांची
या कामात नेहमीच मदत राहिली असून या नव्या प्रयोगात आम्ही समाधानी आहोत.
प्रकाश कारंडे (लाभार्थी):- गावातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे मीही ऊस
शेती करत होतो. रोजगार सेवकाच्या मदतीने यात वाटचाल केली. यळगूडवरून बियाणे आणून रोपे
तयार केली. चिकोडीवरून अंडीपुंजच्या अळ्या आणल्या. त्यामध्यमातून चांगल्या पध्दतीने
कोष निर्मिती केली. दीड लाखाचा फायदा झाला. शिवाय शासनाकडूनही 1 लाख रूपये मिळाले.
या कामात पत्नी श्वेताचा हातभार सदैव असतो.
तानाजी पाटील (ग्राम रोजगार सेवक):- सुरूवातीला हास्यास्पद वाटणारी गोष्ट
गावामध्ये ठरली होती. परंतु, जसजसे शेतकरी प्रयोग करत गेले. त्यामध्ये मिळणारे यश पाहून
लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढली. गावामध्ये एकूण 13 शेतकऱ्यांनी 1 एकर आणि चौघांनी अर्धा एकरवर अशा 17 जणांनी तुती लागवड केली
आहे. एकदा लागवड झाल्यानंतर सलग 15 वर्षे उत्पन्न घेवू शकतो. किटक संगोपन गृहासाठी
शासनाकडून 213 मजुरांची हजेरी मिळते. पहिल्या वर्षी 282 दिवस, तीन वर्षासाठी 895 दिवस
असे तीन ते सव्वातीन लाखापर्यंत शासनाचे अनुदान मिळते. 7 ते 8 लोकांनी शेड उभारणी केली
आहे. एका बॅचला 30 ते 35 हजार रक्कम अधिक 238 रूपये प्रमाणे मनुष्य दिवस मिळत गेले,
त्यामुळे उसापेक्षा जास्त नफा या व्यवसायात असल्याने सद्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अधिकाधिक बेरोजगार, शेतकरी यांनी याकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
एकूणच
बेले गावच्या शेतकऱ्यांची रेशीम कोष उत्पादनातील वाटचाल पाहता, ‘रेशमाच्या
कोषांनी..लाल काळ्या मातीतून..लाखोंचा कशिदा..बेलेच्या शेतकऱ्यांनी काढिला..’
असेच म्हणावे लागेल.
-प्रशांत सातपुते
-जिल्हा
माहिती अधिकारी
कोल्हापूर
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.