मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 






कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधक लस आपल्या देशात तयार झाली आहे. ही स्वदेशी लस सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

माहिती व प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोकसंपर्क केंद्राच्यावतीने कोव्हिड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आत्मनिर्भर भारत आणि कोरोना लसीकरण बाबतची जनजागृती मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्याबाबतची माहिती गावागावात पोहचविण्याबाबत या जनजागृती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. त्याचा लाभ निश्चितपणे होईल.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 16 व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करुन तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोव्हिड-19 लसीकरण मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्यावतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये 10 दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोव्हिड-19 विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यत पोहचविणे हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करुन देण्यात येणार आहे.

यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करुन लोकांपर्यत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे. क्षेत्रीय प्रचार सहायक, कलापथकाचे प्रबोधन शाहिरी कलापथकाचे हिंदुराव लोंढे व पथक परिश्रम घेत आहेत.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.