शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार अत्याधुनिक साधनसामुग्री, पुरेसा औषधसाठा वाहनांमध्ये उपलब्ध - आरोग्य राज्यमंत्री पाटील-यड्रावकर

 




  कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय)-  फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यामुळे शिरोळ तालुक्यामधील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. अत्यावश्यक प्रसंगी तातडीने पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी मदत होणार आहे, व्हेटर्नरी डॉक्टर, अत्याधुनिक साधनसामुग्री, पुरेसा औषधसाठा या वाहनांमध्ये उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांच्या पशुधनाला चांगली सेवा मिळेल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला.

       मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यात पशुवैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक प्रसंगी तातडीने सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी वाहन (ॲम्ब्युलन्स) सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून प्राप्त झाले. या वाहनाचा लोकार्पण सोहळा राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती कविता चौगुले उपस्थित होत्या.

राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यामधील अर्जुनवाड येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी रुपये ६० लाख, चिपरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी संरक्षक भिंत उभारणे व चेनलिंक कंपाऊंड बांधणे कामासाठी १९ लाख रुपये तसेच जांभळी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीस संरक्षक भिंत उभारणे व चेनलिंक कंपाऊंड बांधणे कामासाठी २० लाखाचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्या मधून मंजूर केला आहे.

यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील केतकर विभाग, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. रानभरे,जयसिंगपूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र झेले आदी मान्यवर उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.