कोल्हापूर दि. 2
(जिमाका) : लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वानिमित्त
आयोजित स्टार्टअप समिटमध्ये चांगल्या संकल्पनाना मूर्त स्वरुप देण्याचा मानस आहे. स्टार्टअपना
प्रोत्साहन देण्यासाठी या इनोवेशन कॉम्पिटीशन व प्रदर्शनात पहिल्या पाच क्रमांकाच्या
स्टार्टअपना शासनाकडील 10 लाखाची कामे देण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज
पाटील यांनी आज येथे केले.
लोकराजा
राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वानिमित्त शाहू मिल येथे शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर, महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी आणि जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित लोकराजा इनोवेशन कॉम्पिटीशन व प्रदर्शन, लोकराजा स्टार्टअप
गुंतवणूकदार समिटचे उद्धाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पालकमंत्री
श्री. पाटील म्हणाले, या इनोवेशन कॉम्पिटीशन व प्रदर्शनातून चांगले विषय समोर यावेत. कोल्हापूरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी
याची मदत व्हावी, यासाठी चांगल्या संकल्पनाना
प्रोत्साहन देण्याची भूमिका आहे. कोल्हापूरात इनोवेशनसाठी चांगले वातावरण असून
विद्यार्थी व उद्योजकांनी यामध्ये सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री.
पाटील यांनी यावेळी केले.
आजच्या काळात
छोट्या-छोट्या गोष्टींना मोठी मागणी असून या गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी स्टार्टअप
एक प्रभावी माध्यम आहे. नवे विचार, नव्या संकल्पनांचा स्वीकार राज्य शासन करत असून राज्य शासनाने टेक्नॉलॉजी संबंधातील
कामे स्टार्टअपना देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी
सांगितले.
पालकमंत्री
श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायाठी पुरक वातावरण असल्याने
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वानिमित्त शाहू मिल येथे इनोवेशन
कॉम्पिटीशन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या स्टार्टअप समिटमधील चांगल्या संकल्पनांचा
स्वीकार जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय वाढीसाठी केला जाणार असल्याचे पालकमंत्री श्री.
पाटील म्हणाले.
राजर्षी
शाहू छत्रपती महारांजानी त्या काळी नवीन उद्योग, व्यापारपेठा सुरु करुन विकासाला गती
दिली. आणि कला, क्रीडा, कृषि, व्यापार, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काम केले.
समतेचा संदेश देणाऱ्या या कर्तुत्ववान राजाचा 6 मे 2022 रोजी स्मृती शताब्दी कार्यक्रम
आहे. या दिवशी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता पाळून लोकराजाला अभिवादन करुन आदरांजली
वाहूया,असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.
अडचणी सोडविण्यासाठी
चांगल्या संकल्पनांचा जन्म होत असल्याचे सांगून शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. शिर्के
म्हणाले, अशा चांगल्या संकल्पनांचा जन्म कोल्हापुरात होत आहे. इनोवेशनला वय नसते यासाठी प्रत्येकाने चांगल्या
संकल्पना राबविण्यासाठी ध्यास घ्यावा. महाराष्ट्र
इनोवेशन सोसायटीमार्फत शिवाजी विद्यापीठाला या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला असून
उद्योजकांना चांगल्या संकल्पना सुचविण्यासाठी विद्यापीठ सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले.
शाहू मिलमध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल डॉ. शिर्के यांनी त्यांचे अभिनंदन केले.
राजर्षी शाहू महाराज हे भविष्याचा वेध घेणारे राजे
होते. त्यांनी सर्व क्षेत्रात योगदान दिले असून राजर्षी शाहू महाराजांच्या क्षमतेला,
कार्याला वंदन करण्यासाठी, नवीन पिढीला राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची ओळख व्हावी
यासाठी स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाचे आयोजन
करण्यात आले आहे. स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी या इनोवेशन कॉम्पिटीशन व प्रदर्शनाचे
आयोजन करण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
राहूल रेखावार यांनी केले.
यावेळी शिवाजी
विद्याठाचे डॉ. एम. एस. देशमुख, रवी डोली,एम. वाय. पाटील, पी. डी. राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालक शिवाजी विद्यापीठाचे प्रा. हर्षवर्धन पंडित यांनी केले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.