कृतिशील लोकसहभागातूनच समाज परिवर्तन शक्य
शासकीय सेवा ही समाज सेवेसाठी सर्वात प्रभावी साधन
कृतिशील समाज निर्मितीसाठी समाजाचा दबाव ही महत्वपूर्ण
इचलकरंजी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी
प्रयत्न करावेत
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) :- सर्व काही शासन करेल ही मानसिकता
लोकांनी बदलली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करून समाज परिवर्तन
शक्य आहे. कोणत्याही क्रांतिकारी विचाराने समाजव्यवस्था उलटापालट करून समाज परिवर्तन
होऊ शकत नाही, त्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे लोकांनी कृतिशील सहभाग
नोंदवून समाज परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न स्वतःपासून करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे
प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी केले.
इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराच्या वतीने
आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या पन्नासाव्या वर्षातील सहाव्या व्याख्यानाचे पुष्प श्री.
विकास खारगे यांच्या "कृतिशील सहभागातून समाज परिवर्तन" या विषयावरील व्याख्यानाने
गुंफले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार प्रकाश आवाडे यांनी
भूषविले. यावेळी सौ. मीनाक्षी विकास खारगे, आपटे वाचन मंदिराच्या कार्यवाहक मीनाताई
कुलकर्णी, शामसुंदर माडदा, हर्षदा मराठे यांच्यासह वाचनप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. खारगे म्हणाले
की, स्वतः काही करायचे नाही, सर्व काही शासन करेल म्हणून बसून राहायचे. शासनालाही प्रत्येक
गोष्ट करण्यात मर्यादा येत असतात. त्यामुळे लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन छोट्या छोट्या
गोष्टी प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. अशा छोट्या गोष्टीतूनच समाज परिवर्तन होऊ शकते.
कृतिशील सहभाग हाच समाज परिवर्तनाची नांदी ठरेल असे त्यांनी सांगितले.
लोकांना कृतिशील व्हावे असे वाटते परंतु
ते पुढे येत नाही कारण अशा लोकांना व्यासपीठच उपलब्ध नसते. तरी समाजातील विविध प्रकारच्या
स्वयंसेवी संस्थांनी अशा लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास सर्वसामान्य लोक कृतिशील
सहभाग नोंदवतील असे मत श्री. खारगे यांनी व्यक्त करून त्यांच्या प्रशासकीय सेवेतील
विविध योजनांची अंमलबजावणी करत असताना त्या त्या वेळी लोकांचा घेतलेला कृतिशील सहभागाची
उदाहरणे देऊन त्यामुळे सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीने शासकीय योजनांचा लाभ मिळाला
याची माहिती त्यांनी दिली.
शासकीय सेवा ही समाज सेवेसाठी सर्वात प्रभावी
साधन असल्याचे श्री. खारगे यांनी सांगितले. शासकीय योजनांची माहिती देत असताना अथवा
त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी लोकांचे योग्य पद्धतीने प्रबोधन केल्यास
लोक सकारात्मक प्रतिसाद देऊन ती योजना यशस्वी होऊ शकते असे मत त्यांनी कृतीतून सिद्ध
केल्याची माहिती दिली.
कृतिशील समाज निर्मितीसाठी समाजाचा दबाव असणेही
तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. खारगे यांनी सूचित करून स्वतः त्याबाबत सकारात्मक राहिल्यास
इतरांनाही प्रोत्साहन देऊ शकतो असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने संधी शोधण्यासाठी
सतर्क असले पाहिजे. आपल्याला समाजासाठी जे करता येईल तेवढे करत राहावे. सल्ले देत बसण्या
ऐवजी प्रत्यक्ष कृती करावी, असे आवाहन श्री. खारगे यांनी केले.
प्रत्येक व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीतून त्याच्या
पद्धतीने समाज परिवर्तनासाठी काम करत असते. आशा व्यक्तीमुळे समाज परिवर्तनाची प्रक्रिया
अविरतपणे सुरू आहे. अशा छोट्या गोष्टीतून समाज परिवर्तन करत असलेल्या लोकांची व संस्थांची
उदाहरणे श्री. विकास खारगे यांनी देऊन असे लोक समाज परिवर्तनाच्या कार्यात इतरांसाठी
आदर्शवत असल्याचे मत व्यक्त केले.
कृतिशील सहभागातून समाज परिवर्तन हे शक्य
असून सनदी सेवेत दाखल झाल्यापासून श्री. खारगे यांनी यवतमाळ येथे प्रौढ शिक्षण अभियानात
चांगले काम करुन जिल्ह्याची साक्षरता वाढ करण्यासाठी कृतिशील सहभाग घेतला. त्याप्रमाणेच
आरोग्य विभागात काम करत असताना विना शुल्क 108 रुग्णवाहिका सुरु केली. या रुग्णवाहिकेचा
लाभ अत्यंत गरजू व एमर्जन्सी रुग्णांना होत आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत
देशातील पहिले पेपरलेस ऑफिस ही संकल्पना राबवली तसेच त्याच ठिकाणी ई बँकिंग हा उपक्रम
राबवून आरोग्य सेवा सुधारण्यासाठी मौलिक भर घातली.
तसेच वातावरणात झालेल्या बदलामुळे वातावरणात
कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले, त्यासाठी राज्यात पन्नास कोटी वृक्ष लागवड मोहीम
राबवली व यामुळे कार्बन-डाय-ऑक्साईड शोषून घेण्यास मदत होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर
लोक सहभाग घेण्यात आला. शासन, लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी
संस्था, विद्यार्थी व लोकांचा कृतिशील सहभाग या मोहिमेसाठी मिळाल्याने ही मोहीम यशस्वी
झाली.
प्रत्येकाने छोट्या-छोट्या गोष्टी योग्य
पद्धतीने केल्यास समाज परिवर्तन होत राहील व कृतिशील समाज निर्मिती झाल्यास अनेक बाबीत
शासनावरचे अवलंबित्व कमी होईल व यातून निर्माण झालेला समाज अधिक सुदृढ होईल, असे मत
श्री. खारगे यांनी व्यक्त करून कृतिशील समाज निर्मितीसाठी सर्वांनी स्वतःपासून सुरुवात
करावी असे आवाहन केले.
प्रत्येक व्यक्तीला वाचनाची आवड असावी व वाचनालयाच्या
माध्यमातून त्यांना सहज विपूल ग्रंथ संपदा व साहित्य वाचनासाठी उपलब्ध झाले पाहिजे.
ग्रंथ व रोजच्या वृत्तपत्रे वाचनामुळे आपला दृष्टीकोन चौफेर बनतो असे मत व्यक्त करून
श्री. खारगे पुढे म्हणाले की, इचलकरंजी येथे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी आपटे वाचन मंदिर व अन्य साहित्य संस्थांनी
प्रयत्न करावेत.
समाजातील प्रत्येक घटकाने सुदृढ समाज निर्मितीसाठी
आपले योगदान देण्याचे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. तसेच
या कामात प्रसार माध्यमांची भूमिकाही तेवढीच महत्त्वपूर्ण असल्याचे मत ही त्यांनी मांडले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन
करून वसंत व्याख्यान मालेचा शुभारंभ करण्यात आला. या व्याख्यान मालेचे आजचे प्रमुख
व्याख्याते डॉ.विकास खारगे यांचा अल्प परिचय अशोक केसरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक हर्षदा मराठे यांनी केले तर आभार अशोक केसरकर यांनी मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.