बुधवार, ४ मे, २०२२

कोल्हापूर नगरीत गुंजणार "महा-ताल: वाद्यमहोत्सवाचा" निनाद. सांस्कृतिक कार्य मंत्री, अमित विलासराव देशमुख यांची माहिती मामेखान, राकेश चौरसिया, शिवमणी सारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती

 

 

कोल्हापूर दि. 4 (जिमाका): छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीचे औचित्य साधून, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यात निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, दिनांक ५ ते ०७ मे या दरम्यान कोल्हापूर येथे "महा-ताल: वाद्य महोत्सव" आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दुर्मिळ लोकवाद्ये व त्याबाबतची माहिती आणि सादरीकरण प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना मिळू शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात पारंपरिक वाद्यांची मोठी परंपरा आहे.  या वाद्यांचे महत्व सर्वाना समजावे, त्याची माहिती व्हावी यासाठी राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्ताने अशा वाद्यांच्या जतन व संवर्धनासाठी महावाद्य मेळावा तसेच पारंपरिक वाद्यांचा महोत्सव व प्रदर्शन द खासबाग मैदान, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रातील लोकवाद्यांच्या नामशेष होणाऱ्या / लोप पावत असलेल्या व लुप्त झालेल्या वाद्यांचे जतन व संवर्धन व्हावे, विशिष्ट आधुनिक तंत्रज्ञान वापरुन वाद्ये कशी वाजतात याचा अनुभव प्रेक्षकांना देणे, वाद्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके देणे, वाद्य विषयक माहिती प्रदर्शीत करणे, अशा वाद्यांचा महोत्सव साजरा करणे व यामधून व्यावसायिक दृष्टीकोन अंगिकारणे आणि यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना निमंत्रित करणे इ.  या वाद्य मेळाव्याचे मुख्य हेतू आहेत. लोकवाद्यांमध्ये सुशिर वाद्ये, तंतू वाद्ये, नाद वाद्ये, घोष वाद्ये, रणवाद्ये असे विविध प्रकार पहावयास मिळतात.  लोकवाद्यांच्या विविध प्रकारापैकी;

तारपा, मोहरीपावा, घांगळी, घुमळ, कासाळे, संबळ, ढोलकी, मृदंग, पुंगी, सनई, तुणतुणे, पावा, घुंगरु, जोगिया सारंगी, खुळखुळा, चिमटा, मसक, सातारा, एकतारी, पिपाणी, नगारा, चिपळया, मटके, मुरसिंग, उमरु, दुदुंभी, खंजिर, शहनाई, सुंदरी, शिंग, तुतारी, कर्णा, सारिंदा, पेना, नंदुणी, मुरसिंगार, विचिमविणा, गोपीचंद, संबाला, सुरसोटा, घंटा, उहाळा, दिमडी, मादळ, डेरा, थाळी, तडफा, पेपुडी अशा कितीतरी वाद्यांचा या मेळाव्यामध्ये समावेश असणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महाताल वाद्य महोत्सवामध्ये दि.5 मे रोजी 200 कलाकार ढोल, ताशा, संबळ वाद्यांचा निनाद करणार आहेत.  सायं.5. वाजता सुप्रसिदध कलाकार मामेखान व कलाकार यांचा रॉक्स अँड रुटस कार्यक्रम सादर होणार आहे. सायं.7 ते 8 वाजता या महोत्सवाचे श्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील मा.राज्यमंत्री, गृहनिर्माण, परिवहन तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सुप्रसिदध बासरीवादक श्री राकेश चौरसिया यांचा फ्युजन वादनाचा कार्यक्रम होणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वामध्ये म्हणजेच दि.6 मे रोजी सायं.4 ते 5 या वेळेत 200 हलगी व संबळ वादक कलाकार मानवंदना देणार आहेत. सायं. 5ते 6.30 या वेळेत मधुर पडवळ व कलाकार फोल्क्सवॅगन बँडव्दारे विविध कलाविष्कार सादर करणार आहेत. तर रात्री. जगप्रसिदध कलाकार  शिवमणी हे विविध वाद्यांचा कलाविष्कार सादर करणार आहेत.

महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वामध्ये  दि. 7 मे रोजी सायं. 4 ते 5 या चोंडक आणि ढोल वादक  कलाकार मानवंदना देणार आहेत. सायं.5 ते 6.30 वाजता  ‘फोक ड्रम ऑफ महाराष्ट्र' विजय चव्हाण आणि सहकलाकार यांचा कार्यक्रम होईल. तर रात्री 8 ते 10 या वेळेत उस्ताद तौफिक कुरेश याचा कलर्स ऑफ रिदम हा कार्यक्रम सादर  होणार आहे. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर आसनव्यवस्था निश्चित होईल. कोल्हापूरातील सर्व रसिकांना व प्रेक्षकांना या तीन दिवसीय महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.