- शाहू
महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या
जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असली पाहिजे हे वचन होतं
- शाहूंच्या
विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृतज्ञता पर्व महत्त्वाचे
- शाहू
स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल
- प्रत्येक
शाळेत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर होण्यासाठी शाहू महाराजांच्या
चित्रांचे प्रदर्शन भरवावे
कोल्हापूर,
दि.6 (जिमाका):- ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर
संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल
तिथे तिथे लढूया व सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती
शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन
काम करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100
वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त शाहू
मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्य प्रणालीद्वारे
मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे
पुणे येथून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाहू महाराज होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे
म्हणाले की, प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो.
आजोबांनी त्यांची जीवनगाथा लिहिली त्यात हे नातं नमूद केलं आहे. आज देखील शाहू
महाराज कोल्हापूरात आहेत असं वाटतं. ते आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली हे जाणवत नाही. छत्रपती शाहू
महाराज हे महामानव होते. महाराजांची केवळ २८ वर्षाची कारकीर्द. ४८ व्या वर्षी शाहू
महाराजांचे निधन झाले. असं वाटतं की, त्यांना आणखी आयुष्य मिळालं असतं तर आज
राज्याचं चित्र वेगळ असतं. पायाभूत सुविधांच्या बाबतीत नाही तर समाज सुधारणेच्यादृष्टीने
वेगळं चित्र असतं.
आज आपण स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव साजरा करत असतांना छत्रपती शाहू महाराजांचे १०० व स्मृतीवर्ष साजरं
करत आहोत. अस्पृश्यांचा उद्धार, शिक्षण प्रसार, धरणे, वसतिगृहे, कृषी, उद्योग
क्षेत्रात राजर्षि शाहू महाराजांचे काम डोंगराएवढे. हा दूरदृष्टी असलेला राजा, आज
या कामासाठी वेगवेगळे विभाग आहेत पण या सगळ्या खात्यांचे काम एका माणसानं केलं असे
सांगून श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचे वारे वाहत असतांना अनेक राजे होऊन गेले. नुसते
गादीवर बसले म्हणून राजे झाले असेही अनेकजण होते. पण शाहू महाराज हे गादीवर बसलेले राजे नव्हते. या राजाने सातत्याने दीनदुबळ्यांसाठी काम केलं, त्यांच्यासाठी
संघर्ष केला. त्यांनी अस्पृश्य वर्गाला माणसाप्रमाणे वागवण्यासाठी संघर्ष केला.
याचा उल्लेख प्रबोधनाकारांनी आपल्या पुस्तकात केला आहे. माणसाला माणूस म्हणून
जगण्याचे अधिकार दिले पाहिजेत, ते देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जे काम केलं
ते मार्गदर्शक आहे.
शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं.
त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असले पाहिजे हे वचन
होतं. आज जी वृत्ती दिसते आहे त्याच्याविरोधातच शाहू महाराज लढले. आजोबांकडून जे
ऐकले, मी वाचले त्यावरून दिसतं की
छत्रपती शाहू महाराज कोणत्या व्यक्ती विरोधात नव्हते तर वृत्तीविरोधात होते. वंचित
वर्गासाठी छत्रपती शाहू महाराजांनी काम केलं. शिक्षणातील भेदभाव दूर करण्याचं काम
शाहू महाराजांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांना वंदन करतांना त्यांनी दाखवलेल्या
वाटेवरून पुढं जाऊया, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.
राजर्षी छत्रपती शाहू
महाराजांच्या पुरोगामी विचारावर राज्य चालत असून प्रत्येक पिढीने शाहू विचारांचा
अंगिकार केला पाहिजे. शाहूंच्या विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे
कृतज्ञता पर्व महत्त्वाचे आहे असे सांगून उपमुख्यमंत्री
अजित पवार पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू
महाराजांनी पुढे नेला. शाहू महाराजांचे काम हे डोंगरा एवढे मोठे असून त्यांचा
प्रत्येक विचार हा क्रांतिकारी होता. त्यांच्या सामाजिक न्याय विचारावरच सामाजिक
क्रांती घडली, असेही त्यांनी यावेळी विशद केले. तसेच छत्रपती शाहू महाराज हे
रयतेचे काळजी घेणारे, आधुनिकतेचा स्विकार करणारे व दूरदृष्टी असलेले लोकराजा होते
व त्यांनी सर्व जाती धर्मांना एकत्रित ठेवून विविध क्षेत्रात विकास घडवून आणला.
कोणत्याही
महापुरुषाच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकातील निधी ठेवण्याची आवश्यकता नाही तर अशा
स्मारकासाठी जेवढा आवश्यक निधी असेल तो सर्व निधी देण्याची जबाबदारी ही राज्य
शासनाची असून शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी
ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली. तसेच कोल्हापुरात सारथी संस्थेसाठी
जागा देण्यात आलेली असून त्याबाबतचा आराखडा पुढील पंधरा दिवसात पूर्ण होईल असे
त्यांनी सांगितले.
छत्रपती शाहू
महाराजांचे पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच
मानवतावाद व समतावाद यावर विशेष लक्ष देऊन देशभरात जातिवाद पसरणार नाही याची काळजी
घ्यावी व महाराजांचे समतेचे विचार देशभरात पोहोचावेत, असे आवाहन शाहू महाराज
छत्रपती यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
छत्रपती शाहू
महाराजांच्या स्मृती दिनाचा हा
कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम असून आपण पुरोगामी विचारांचे वारसदार आहोत याचा
अभिमान वाटतो, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगून सर्व संत परंपरातील
विचारधारा ही समतेवर आधारित असून शाहू महाराज हे समतेचा विचार कृतीत आणणारे लोकराजा
होते असे त्यांनी म्हटले. तसेच शाहू मिलच्या या 27 एकर जागेवर शाहू स्मारकाचा जो
अभिनव प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्या प्रकल्पाच्या कामासाठी सर्व प्रकारचे
सहकार्य करण्यात येईल याची ग्वाही देऊन ते म्हणाले की या ठिकाणी शाहू महाराज
यांच्या विचाराचे एक दालन निर्माण करावे. त्या माध्यमातून राज्य व देशाला
समता आणि मानवतावादी विचारांची दिशा
मिळेल, असे त्यांनी सूचित केले.
देशभरात जातिवाद व
भेदभाव भडकावण्याचे काम केले जात आहे अशा परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांच्या
समतेच्या विचारांची देशाला गरज असून हे विचार देशभर पोहचविण्यासाठी सर्वांनी
सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनस्त
सर्व महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराजांचे चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येईल व
शाहू विचारांचा जागर विद्यार्थ्या पर्यंत पोहोचविला जाईल असे उच्च व तंत्र शक्षण
मंत्री उदय सामंत यांनी सांगून छत्रपती शाहूंच्या शंभर वर्षापूर्वीच्या नियमावलीचे
पालन शासन आजही करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू
महाराजांनी रयतेचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले व त्यांचे समतेचे विचार
देशभरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपण प्रथमच संसदेमध्ये शिवजयंती व
शाहू जयंती साजरी केली,अशी माहिती माजी खासदार
संभाजीराजे यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शंभरावा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व
म्हणून दिनांक 18 एप्रिल 2022 ते 22 मे 2022 या कालावधीत साजरा केला जात आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास केला. राज्य व
देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचे हे विचार या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत
पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख
जिल्हाधिकारी राहुल रेखावार व कृतज्ञता पर्व समितीने मोठी मेहनत घेतली असल्याची माहिती पालकमंत्री सतेज
पाटील यांनी दिली.
शाहू स्मारक आराखड्यात सर्व मान्यवरांनी
दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येईल तसेच लोकांना जे अपेक्षित आहे ते सर्व
शाहू महाराजांच्या समारकात निर्माण केले जाईल, असे पालकमंत्री श्री पाटील यांनी
सांगून राज्य शासनाने कृतज्ञता पर्व वर्षभर साजरे करून शाहू विचारांचा जागर
राज्यात सर्वत्र करण्यात येईल असे सांगितले. तसेच आज सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आहे त्या ठिकाणी शंभर सेकंद
स्तब्ध उभे राहून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून
मानवंदना दिली.
प्रत्येक शाळेत शाहू
महाराजांच्या विचारांचा जागर होण्यासाठी शाहू महाराजांच्या चित्रांचे प्रदर्शन
भरवण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.
तसेच शाहू स्मारकामध्ये वस्त्रोउद्योगाशी संबंधित एक दालन समाविष्ट करून
महाराजांचे समतेचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन
त्यांनी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राजर्षी छत्रपती शाहू
महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्याबाबत दिनांक
18 एप्रिल पासून ते आजपर्यंत केलेल्या विविध कामांची माहिती दिली. तसेच या पर्वाचा
समारोप दिनांक 22 मे 2022 रोजी शाहू मिल येथे होणार असल्याचे सांगून छत्रपती शाहू
महाराजांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच शाहू महाराजांचे विचार व आदर्श तरुण
पिढी समोर आणण्यासाठी हे पर्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महापालिका आयुक्त श्रीमती बलकवडे यांनी शाहू मिल येथे शाहू महाराजांचे
स्मारक होणार असल्याचे सांगून त्या बबतचा आराखडा व त्यानुसार केलेली चित्रफीत
दाखवण्यात आली.
छत्रपती शाहू महाराज
यांच्या विचारावर आधारित असलेले "ग्लिम्पसेस ऑफ राजर्षी शाहू महाराज" या
इंग्रजी भाषेच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर छत्रपती
संभाजीराजे राजकोट येथे गेले असताना त्यांना तेथील शिक्षण संस्थेकडून देण्यात
आलेल्या शाहूमहाराजांच्या दुर्मिळ चित्राचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
त्याप्रमाणेच गोकुळ दूध संघामार्फत कृतज्ञता पर्व निमित्त निर्माण केलेल्या
दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी झाले. त्यानंतर सभागृहाबाहेर कृतज्ञता पर्वा निमित्त
तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. या
कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर शाहूप्रेमी नागरिक उपस्थित होते. त्या सर्वांचे व
सर्व मान्यवरांचे आभार श्री. उदय गायकवाड यांनी मानले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन
करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती
शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण केले.
यावेळी
व्यासपीठावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास
व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री,
सतेज ऊर्फ बंटी पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर,
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी
प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती
मालोजीराजे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार शिक्षक मतदार संघ
पुणे विभाग जयंत आसगावकर, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू
आवळे, आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव, सचिव वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य
सौरभ विजय, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी
बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक
शैलेश बलकवडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.