◆ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करा
◆ दरडी कोसळून झालेले नुकसान व उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करा
◆ नाल्यांतील गाळ काढून प्रवाहित करा
◆ घाटमार्गावरील नैसर्गिक चर काढून घ्या
◆ पुनर्वसनाची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा
◆ आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुक्यांना बोटी व अन्य सामुग्री उपलब्ध करुन
द्या
◆ पुरप्रवण क्षेत्रात बोटी तैनात ठेवा
◆ पूरामुळे ट्रान्सफॉर्मर, शेती पंपाचे नुकसान होवू नये यासाठी उपाययोजना
करा
◆ आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत देण्याचे नियोजन करा
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): शहरासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती
उद्भवू नये, यासाठी तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना करुन मान्सूनच्या
पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील
यांनी दिले.
कोल्हापूर
जिल्ह्याची मान्सून पूर्व आढावा बैठक गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत
होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश
बलकवडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
अधीक्षक अभियंता एस. पी. कुंभार यांच्यासह महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कृषी,
जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभागासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री
सतेज पाटील म्हणाले, मागील वेळच्या पूर परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी आपापली भूमिका
चांगल्याप्रकारे पार पाडली आहे. पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व
उपाययोजना कराव्यात. पण आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व बचाव कार्यात कोणतीही
त्रुटी राहता कामा नये तसेच नागरिकांची तक्रार येता कामा नये, याची दक्षता घ्यावी.
नागरिकांना वेळेत मदत उपलब्ध करुन देणे, नागरिक व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
करणे, धान्य वाटप आदी बाबींचे काटेकोर नियोजन करा. पुनर्वसनासंबंधीची प्रलंबित प्रकरणे
तात्काळ मार्गी लावा. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडे लवकरात लवकर सादर करा, असे
त्यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापनाच्या
दृष्टीने तालुक्यांना देखील बोटी आणि अन्य आवश्यक ती साधन सामग्री उपलब्ध करून द्या,
पूरप्रवण क्षेत्रात बोटी तैनात ठेवा. घाटमाथ्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक
चर काढून घ्या, जेणेकरून पुराचे पाणी साचल्यामुळे रस्ते खराब होणार नाहीत. जिल्ह्यात
दरडी कोसळून झालेले नुकसान व आवश्यक उपाययोजनांबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करा.
हा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुराच्या
पाण्यामध्ये ट्रान्सफॉर्मर बुडाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर आणि शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणावर
नुकसान होते. यावर उपाय म्हणून पूरपरिस्थितीत ट्रान्सफॉर्मर प्लास्टिकच्या आवरणाने
सुरक्षित पद्धतीने झाकून घेता येतील का याचा विचार करा. याकामी ‘स्टार्ट अप’च्या तरुणांची
मदत घ्या, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी
राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये, यादृष्टीने आवश्यक त्या
उपाययोजना करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा आढावा घेऊन तालुकानिहाय
नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा प्रभावीपणे वापर करण्याचे
नियोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जलसंपदा
विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता
श्री. कुंभार यांच्यासह यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.