कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) :- शाहु मिलचं नाव एकलं की नजरेसमोर येतं तयार होणारं कापड.. काळाच्या ओघात मिल
बंद झाली.. कापड निर्मिती थांबली.. पण सुमारे 19 वर्षानंतर लोकराजा राजर्षी छत्रपती
शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आज शाहु मिलमध्ये कापड जत्रेचं आयोजन
करण्यात आलं. त्यामुळं बऱ्याच वर्षांनी शाहू मिलमध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्ड चे कापडाचे
तागे दिसले.. नुसते दिसले नाहीत, तर माफक दरात कापड खरेदीची संधीही ग्राहकांना मिळाली..
अभूतपूर्व प्रतिसाद मिळणाऱ्या
या कापड जत्रेचं उद्घाटन खासदार संभाजीराजे छत्रपती व संयोगिताराजे छत्रपती यांच्या
हस्ते तर मोश्मी आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं.
यावेळी संयोजन समितीचे आदित्य बेडेकर, उदय गायकवाड,
ऋषिकेश केसकर, जयदीप मोरे आणि यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन उपस्थित
होते.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या
संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या नियोजनातून कृतज्ञता पर्वामध्ये
कापड जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्यापार, उद्योगाला चालना देण्याबरोबरच रोजगाराची
संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं शाहू
महाराजांनी श्री शाहु छत्रपती मिलची उभारणी केली. शाहु महाराजांनी मिलची मालकी
स्वतः कडे न ठेवता करवीर संस्थानची मालकी ठेवली,
शाहु राजांचा हा वेगळा पैलू यातून दिसून येतो. या ठिकाणी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक
व्हावं. स्मारकामध्ये टेक्सटाइलचं एक दालन असावं, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी
उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली.
'कापड जत्रेतील कापडाचा पोत आणि उत्तम दर्जा पाहून
असे कापड आपल्या जिल्ह्यात निर्माण होते याचा कोल्हापूरकर म्हणून आपल्याला अभिमान आहे',
अशी भावना संयोगिताराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. नागरिकांनी कापड जत्रेस भेट देऊन
आवश्य खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
'इचलकरंजी हे महाराष्ट्राचे
मँचेस्टर आहे. इथे तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या कपडामुळे कापड व्यवसायात इचलकरंजीने
आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे मत मोश्मी आवाडे यांनी व्यक्त केले.
कापड जत्रेमध्ये ३० हून अधिक स्टॉल असून यामध्ये २० उत्पादकांनी
सहभाग घेतला आहे. कापड जत्रेत रेडिमेड शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड गारमेंट, होजिअरी असे
प्रकार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन
यांनी दिली.
खादी, लीनन, कॉटन, डेनिम,
सॅटिन, सॅटिन कॉटन, सीपॉन, सिंथेटिक अशा कापडाचे अनेक प्रकार पाहण्यासाठी व विक्रीसाठी
उपलब्ध आहेत.
आय पी एम सी, ओशन फॅब, क्रिस्टल लीनन, गंगा
अपिरल्स, सोना फॅब्रिक्स, इचलकरंजी टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड, विद्याज बटवा कलेक्शन,
कर्णीज फॅब्रिक्स, बीएपीएस गारमेंट आणि ऍडॉरेबल व्हाईट कलेक्शन, रामकृष्ण ग्रुप आणि
अनेक नामवंत उद्योजकांनी आपले स्टॉल लावले आहेत.
घाऊक किंमतीत कापड खरेदीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
शाहू मिल येथील कापड जत्रेमध्ये अत्यंत चांगले
आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कापड फॅक्टरीच्या व घाऊक दरात उपलब्ध असल्याची माहिती ग्राहकांनी
अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी. लग्नासाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी भेटवस्तू म्हणून कापड खरेदीची ही एक चांगली संधी
आहे. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला प्रचंड गर्दी झाली असून अधिकाधिक ग्राहकांनी या
कापड जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.