बुधवार, १६ जून, २०२१

परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 18 जूनपर्यंत मुदतवाढ

 


           कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय):   महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेअतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.  सन २०२१-२२  या शैक्षणिक वर्षा करिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्यास  दिनांक १८ जून २०२१ पर्यंत  मुदतवाढ देण्यात आली  आहे.

       या  योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking)  300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने अर्ज शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. अर्ज  swfs.applications.2122@gmail.com  या ईमेलवर पाठवून त्याची हार्डकॉपी विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रासह समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, पुणे- ४११००१ येथे सादर करावा. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटूंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व  पीएच.डी.साठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी केले आहे.

००००

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.