गुरुवार, १० जून, २०२१

प्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजनेस 6 महिने मुदतवाढ - जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


कोल्हापूर, दि. 10  (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा योजना 30 मार्च 2020 पर्यंत लागू होती. परंतु विमा योजनेस 24 मार्च 2021 पासून अतिरिक्त 180 दिवसाची म्हणजेच 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

केंद्र शासनाकडून कोविड-19 आजराशी संबंधित रुग्णावर उपचार, तपासणी करणाऱ्या सर्व आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत रुपये 50 लाख इतक्या रक्कमेचा विमा कवच अनुज्ञेय आहे. विमा संरक्षण हे कोविड बाधेवर तपासणी व उपचार करणाऱ्या सर्व संबंधितांना अनुज्ञेय आहे.

कोविड-19 आजाराशी संबंधित कार्यरत असणाऱ्या, आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व संबंधितांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत सादर करण्यात येणारे विमा अर्जाची पात्रता प्रमाणित करुन हे विमा प्रस्ताव संचालक, आरोग्य सेवा, (पुणे) यांच्याकडे सादर करावेत.

यामध्ये खासगी रुग्णालयांच्या कर्मचारी, सेवानिवृत्त, कंत्राटी, रोजंदारीवरील कर्मचारी, बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेतलेले कर्मचारी, अशा, अंगणवाडी कर्मचारी, केंद्र/राज्य/स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी सर्व प्रकारची रुग्णालयात कार्यरत कर्मचारी, रुग्णालयाच्या सेवा शासनाकडून कोविड सेवेसाठी अधिग्रहीत केले असल्यास तसेच खासगी रुग्णालय कोविड उपचारासाठी नोंदणीकृत केले असल्यास या ठिकाणी कार्यरत डॉक्टर्स, नर्सेस व इतर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या सर्व संवर्गांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत विमा संरक्षण लागू आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.