रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

'पुरामुळं नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू ढळू नयेत यासाठी सर्वजण मिळून पूरबाधितांचे पुनर्वसन करुया!' -पालकमंत्री सतेज पाटील

 








 

          कोल्हापूर, दि.8 (जिमाका): 'भविष्यात पुरामुळं जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाच्या डोळ्यांतून अश्रू ढळू नयेत, यासाठी पूरबाधितांच्या पुनर्वसनाचं काम सर्वजण मिळून मनापासून करुया!', असे आवाहन करुन पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

         आजरा,भुदरगड तालुक्यातील पूरबाधित गावांतील नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील पुरबाधित गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच या दोन्ही तालुक्यातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी आमदार राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

            या दौऱ्यादरम्यान गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुरामुळे विहिरी बुजल्या असून त्यांचे पंचनामे व्हावेत, अशी विनंती केली असता पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुजलेल्या विहिरींचे व  नुकसान झालेल्या कृषीपंपांचे पंचनामे करुन नोंदी घ्याव्यात. या विहिरी व कृषी पंपांसाठी मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. याबरोबरच अरुंद झालेल्या व बुजलेल्या ओढे-नाल्यांच्याही नोंदी संबंधित अधिकाऱ्यांनी घेवून पावसाळ्यात ओढ्या-नाल्यांचे पाणी गावठाण व नागरी वस्तीत शिरणार नाही, यासाठी कायस्वरूपी उपायोजना कराव्यात, अशाही सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

           नद्यांमध्ये साचलेला गाळ व पुराच्या पाण्यामुळे वाहत आलेला राडारोडा काढण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.  

 

           आज गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील पूरबाधित भागाला भेट देऊन पालकमंत्री श्री. पाटील यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यावेळी गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे आणि हेब्बाळ तर चंदगड तालुक्यातील दुंडगे, कोवाड, कानडी, फाटकवाडी गावातील पूरग्रस्त नागरिकांशी सवांद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

            चंदगड तालुक्यात ताम्रपर्णी व घटप्रभा नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला. 411 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही तहसीलदार विनोद रणवरे यांनी दिली.

00000

 

        

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.