शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

आपत्तीचा सामना करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा - पालकमंत्री सतेज पाटील

 






कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : गगनबावडा तालुक्‍यात पुरामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. नुकसान भरपाईसाठी परिपूर्ण प्रस्ताव सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाकडे तातडीने पाठवावेत. तालुक्यात मदतीपासून कोणीही वंचित राहू नये, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. भविष्यात पुरामुळे किंवा दरड कोसळणे, रस्ता खचणे यासारख्या गोष्टी घडू नयेत. यासाठी तालुक्याचा मास्टर प्लॅन तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिल्या.

गगनबावडा तालुक्यात पुरामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक पंचायत समितीमध्ये पालकमंत्री श्री. पाटील यांच्या  अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस सभापती संगीता पाटील, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार संगमेश कोडे, गटविकास अधिकारी माधुरी परीट, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, उपस्थित होते

            पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, पूर, अतिवृष्टीने तालुक्यात झालेले नुकसान मोठे आहे. लोकांना वेळेवर मदत मिळावी, यासाठी पंचनामे जलद गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. महसूल आणि विशेषत: कृषी विभागाने याकामी प्राधान्य देऊन 15 ऑगस्ट पूर्वी पंचनाम्याचे काम पूर्ण करावे. कृषी विभागाने पंचनामे करताना पुरामुळे पिकांचे झालेले नुकसान, दरड कोसळून माती पडल्याने झालेले नुकसान, खरवडून गेलेली शेती अशी वर्गवारी करून पंचनामे करावेत.

पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी धोका जादा आहे, त्या ठिकाणचे १०० टक्के पुनवर्सन करण्यासाठी प्राधान्य द्यावे. पुनर्वसनासाठी जागा निश्चित करावी. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागेची पाहणी करून त्याचा सविस्तर आराखडा तयार करावा. पुरामुळे ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, त्यांची तात्काळ, तात्पुरत्या निवासस्थानाची सोय करावी. रमाई आवास, शबरी, आवास योजनेतून ज्यांना घर उपलब्ध मिळू शकते, अशा लाभार्थींची यादी तहसिलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी तयार करावी. पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेले घर संबंधित व्यक्ती पुन्हा नव्याने बांधणार आहेत. अशा लाभार्थींची यादी तयार करावी. पूरामुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू कराव्यात. यासाठी येणाऱ्या खर्चाचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

गगनबावडा तालुक्यात आरोग्य विषयक सुविधा वाढविण्यासाठी भर द्यावा. यामध्ये बेड वाढविणे, इमारत विस्तारिकरण याचा समावेश असावा. यासाठीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा.  अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारती व शाळांची झालेली पडझड याची माहिती घेऊन या संदर्भातील पंचनामे  लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत. तसेच, पावसाळा सुरु होण्यापूर्वीच प्रत्येक विभागाने त्या-त्या विभागाचा एसओपी तयार करावी. मागील काही वर्षातील आलेला पूर, झालेले नुकसान यांचा सविस्तर अभ्यास करून एसओपी तयार करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी महसूल, कृषी, विद्युत वितरण, आरोग्य, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, शिक्षण या विभागाचाही आढावा घेतला.

तहसिलदार श्री. कोडे यांनी गगनबावडा तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पूर व अतिवृष्टीमुळे साळवण व गगनबावडा 42 मंडंळातील 337 कुटूंबातील 1532 लोकांचे तर 447 जनावरांचे स्थलांतर केल्याचे सांगितले.

बैठकीनंतर पालकमंत्री श्री पाटील यांनी तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेवून निवेदने स्वीकारली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

 

सोबत : फोटो जोडला आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.