कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती
कार्यालय) : पूरबाधित गावातील लोकांचे पूनर्वसन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून या लोकांची कायमस्वरूपी सोय केली जाईल. पूनर्वसनाचा
आराखडा तयार करून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री
सतेज पाटील यांनी आज दिली.
शाहुवाडी
व पन्हाळा तालुक्यात पुरामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक पन्हाळा
शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीस आमदार विनय कोरे, पन्हाळा नगराध्यक्ष रूपाली धडेल, मलकापूर नगराध्यक्ष अमोल
केसरकर, सभापती वैशाली पाटील, उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह सर्जेराव
पाटील, कर्णसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री
पाटील यांनी सुरवातीस शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यात पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या
नुकसानीची व प्रशासनामार्फत सुरू असलेल्या पंचनामा कामाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी
ते म्हणाले, पूनर्वसन करताना बाधित लाभार्थीस पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास
योजना, शबरी आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा लाभार्थींची वेगळी यादी करावी.
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. कोणावरही
अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. पूरामध्ये नागरिकांचे जलदगतीने स्थलांतर
करून प्रशासनाने चांगले काम केले आहे. आता प्रशासनाने या सर्वांना मदत मिळवून देण्यासाठी
काम करावे. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षताही घ्यावी.
यावर्षी
अतिवृष्टीमुळे आपल्या जिल्ह्यात दरड कोसळणे, भूस्खलन या घटना घडलेल्या आहेत. यामुळे
परिसरातील शेती, गावे, वाड्या-वस्त्यांना धोका होवून दळणवळणही ठप्प झाले आहे. दरड
कोसळणे आणि भूस्खलनाने रस्त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना
राबविण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
भूगर्भशास्त्रज्ञांकडून माहिती घेवून पन्हाळा रस्त्याचे काम होणार
यावर्षी
अतिववृष्टीने पन्हाळा गड रस्ता पूर्ण बंद झाल्याने पन्हाळ्याचा संपर्क तुटला आहे. पन्हाळा
रस्त्यावर दरड कोसळणे याची कारणे शोधणे गरजेचे आहे. यासाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी
केंद्र शासनाचे संशोधक येत आहेत. या रस्त्याचा अभ्यास करून भूगर्भशास्त्रज्ञांकडून
माहिती घेवून पन्हाळा रस्ता पिचिंग करून करणे गरजेचे आहे. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना
देण्यात आल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. पन्हाळा मुख्य रस्ता सुरू
होईपर्यंत तात्पुरता पर्यायी रस्त्याबाबत वन विभागाशी चर्चा सुरू असून हा रस्ता तातडीने
सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
बैठकीनंतर पालकमंत्री श्री पाटील यांनी पन्हाळा
व शाहुवाडी ग्रामस्थांची निवेदने स्वीकारली.
सोबत -फोटो जोडला आहे
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.