इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

आर्थिक महासत्ता होण्यासाठी शेती विकासाला प्राधान्य आवश्यक - डॉ. डी. वाय. पाटील यांचे प्रतिपादन

     


         कोल्हापूर दि. १५ : भारताची आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पण ही वाटचाल अधिक गतीने होण्यासाठी शेती आणि शेतकर्‍यांचा विचार प्राधान्याने करायला हवा, असे प्रतिपादन त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी आज येथे केले.
      स्टार माझा वाहिनीने आयोजित केलेल्या माझा महाराष्ट्र २०२०- कोल्हापूर विशेष या चर्चासत्राच्या उद्‌घाटनाच्या सत्रात ते बोलत होते. येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमास उद्योग, रोजगार-स्वयंरोजगार मंत्री नारायण राणे, खासदार निलेश राणे, आमदार राजन तेली, आमदार सुभाष चव्हाण, माजी मंत्री दिग्विजय खानविलकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर, उद्योगपती रामप्रताप झंवर आदी उपस्थित होते.
      राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, विकास आणि प्रगतीसाठी औद्योगिकरण व्हायला पाहिजे. पण त्याचबरोबर शेतीचाही विकास व्हायला हवा. शेतीच्या विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठी आवश्यक असणार्‍या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.
      उच्च शिक्षण केवळ १२.५ टक्केच लोक घेऊ शकतात. जास्तीत जास्त युवकांना उच्च शिक्षणाची संधी मिळायला हवी. त्यासाठी महाविद्यालये तीन सत्रात सुरु करायला हवीत, असेही राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितले.
      उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले, प्रगतीसाठी शेती आणि उद्योगांचा विकास व्हायला हवा. सध्या राज्याच्या ढोबळ उत्पादनात शेतीचा वाटा ११ टक्के तर उद्योगाचा वाटा ३६ टक्के आहे. गतिमान प्रगतीसाठी उद्योगाचा ढोबळ उत्पादनातील वाटा वाढायला हवा. पर्यटन क्षेत्राचा औद्योगिक धोरणात समावेश केला आहे, अशी माहिती देऊन उद्योग मंत्री श्री. राणे म्हणाले, राज्यातील औद्योगिक वसाहतीमध्येच आयटीआय सारखी प्रशिक्षण देणारी संस्था उघडणार आहोत. यामुळे उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. राज्य गतीने विकसित करायचे असेल तर आगामी पंचवीस वर्षाचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
      यावेळी  माजी  मंत्री दिग्विजय खानविलकर आणि  उद्योगपती रामप्रताप झंवर यांचीही भाषणे झाली. स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी प्रास्ताविक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.