सोमवार, ३ ऑक्टोबर, २०११

सहकारातील उद्योगांसाठी लवकरच नियमावली करणार -- पालकमंत्री हर्षवर्धन पाटील


                कोल्हापूर दि. १ : सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे प्रक्रिया उद्योग आणि सेवा देणार्‍या संस्थांसाठी राज्य शासन नियमावली तयार करीत आहे. लवकरच ही नियमावली अंतिम केली जाईल अशी माहिती सहकार, संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे दिली.
                 परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेचे  येथे आज उद्‌घाटन झाले. त्यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते.
               येथील शाहुपूरीत झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह, ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील, महापौर वंदना बुचडे, आमदार रामप्रसाद बोर्डीकर, महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा आडके, बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी-कळमकर आदी उपस्थित होते.
            श्री. पाटील म्हणाले, १९६० मध्ये मंजूर करण्यात आलेल्या सहकार कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही नियमावली करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सहकारातील प्रक्रिया उद्योग, सेवा देणार्‍या संस्था यांच्यासाठीही नियमावली करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ते म्हणाले, कोल्हापूर सहकारासाठी प्रसिध्द आहे. येथे दुग्धव्यवसाय, साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. कोल्हापुरातील सहकार चळवळ आदर्श आहे. अशा या शहरात मराठवाड्यातील सुंदरलाल सावजी सहकारी बँकेने आपली शाखा सुरु केली आहे, ही अतिशय चांगली बाब आहे. या बँकेला कोल्हापुरातही चांगले यश मिळेल.
                 महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत जिंतूर येथील सुंदरलाल सावजी बँकेने आज आपली १८ वी शाखा सुरु केली आहे. कोल्हापूर सहकार पंढरी आहे. सहकाराच्या या पंढरीत सावजी बँक आपला ठसा उमटवेल आणि येथील सहकार क्षेत्र अधिक बळकट करेल. नागरी सहकारी बँकांनी अतिशय चांगली कामे केली आहेत. सुंदरलाल सावजी बँकही चांगलेच काम करेल. गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत सुंदरलाल सावजी बँकेचे मी स्वागत करतो. त्यांच्या येथील शाखेला सर्व प्रकारचे सहाय्य दिले जाईल.
            यावेळी बँकेचे उपाध्यक्ष घनश्यामदास गोयल, शाखाधिकारी बी. एस. पाटील आणि बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.