इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

इचलकरंजीला रेल्वेने जोडण्यास पाठपुरावा करु : देशमुख


कोल्हापूर दि. १६ : इचलकरंजी शहराला रेल्वेच्या मार्गावर आणण्यासाठी आपण रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही केंद्गीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी आज दिली.
इचलकरंजी नगरपरिषदेच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याचा उद्‌घाटन समारंभ आज श्री. देशमुख यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार जयवंतराव आवळे, खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष मेघा चाळके, वस्त्रोद्योग महासंधाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार पी.एन. पाटील, संजय घाटगे आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, इचलकरंजी शहराचा विकास गतीने होत आहे. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाचा विकास आणखी गतीने व्हायचा असेल आणि येथील मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्यासाठी इचलकरंजी शहराचा इतर शहराशी दळवळणाच्या सुविधा वाढायला हव्यात. त्यासाठी इचलकरंजी रेल्वे मार्गावर आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. सध्या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के निधी दिल्यास त्या कालाला प्राधान्य दिले जाते. इचलकरंजी रेल्वे मार्गावर येण्यासाठी राज्य शासनाकडेही  निधीसाठी प्रयत्न करु. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाबाबत संशोधन करणारे केंद्गाबाबतही आपण विचार करु असे त्यांनी सांगितले. पंचगंगा नदी शुध्दीकरणासाठी केंद्गीय स्तरावरुन जी लागेल ती मदत देण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाहीही श्री. देशमुख यांनी दिली.
यावेळी खासदार जयवंतराव आवळे, खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार निवेदिता माने यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा मेघा चाळके यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी इचलकरंजी नगरपरिषेने केलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन देसाई आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.